उस्मान ख्वाजाची निवृत्ती जाहीर
वृत्तसंस्था / सिडनी
ऑस्ट्रेलियन कसोटी संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील सिडनीच्या शेवटच्या कसोटीनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्याने आपल्या निवृत्तीच्या घोषणेचा उपयोग कारकिर्दीत अनुभवलेल्या वांशिक कल्पनांवर टीका करण्यासाठी केला.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनीत रविवार 4 जानेवारीपासून खेळविली जाईल. उस्मान ख्वाजाची ही त्याच्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील 88 वी आणि शेवटची कसोटी राहील. 39 वर्षीय उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन संघाची एक दर्जेदार आणि अनुभवी फलंदाज म्हणून ओळखला गेला आहे. सिडनीच्याच मैदानावर ख्वाजाने आपल्या प्रथमश्रेणी क्रिकेटला प्रारंभ केला असून आता तो याच मैदानावर क्रिकेटला निरोप देणार आहे.
पाकमध्ये जन्मलेला उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन संघातून खेळणारा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू आहे. 2018 साली झालेल्या अॅशेस मालिकेतील सिडनीच्या कसोटीत ख्वाजाने इंग्लंड विरुद्ध पहिले शतक (171) झळकविले होते. ख्वाजाने आपल्या वयाच्या 35 व्या वर्षी सिडनीच्या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्ध दोन दमदार शतके झळकविली होती. त्यानंतर त्याने पुढील दोन वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाकडून खेळताना सात शतके नोंदविली. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन निवड समितीने ख्वाजाला पुन्हा संघात स्थान दिले होते. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पर्थच्या पहिल्या कसोटीत पाठदुखापतीमुळे उस्मान ख्वाजाला सलामीला खेळता आले नाही. त्यानंतर अॅडलेडच्या दुसऱ्या कसोटीसाठी त्याला सुरूवातीला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कर्णधार स्टीव्ह स्मिथने ख्वाजाला पुन्हा संघात संधी दिली. या संधीचा फायदा घेत त्याने पहिल्या डावात 82 धावा झळकविल्या होत्या. दरम्यान याच कालावधीत उस्मान ख्वाजाच्या संघातील स्थानांबाबत टिका सुरू झाली. मेलबोर्नच्या चौथ्या कसोटीत ख्वाजाने संघातील स्थान निश्चित केले होते. रविवारी या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सुरू होणार असून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-1 अशी विजयी आघाडी घेत अॅशेस स्वत:कडे राखले आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळांने आपल्याला आजही थोड्या विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने वागणूक दिली जाते. कारण मी पाकमध्ये जन्मलेला असून माझ्या सभोवार मुस्लिम पार्श्वभूमी असल्याने मला वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते, असेही आपल्याला वाटते, असे ख्वाजाने सिडनीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाठतून वेदना सातत्याने जाणवत असून त्या मला असाय्य होत असल्याने मध्यंतरी मी काही दिवस क्रिकेटपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही क्रिकेटपटू संदर्भात वंशिक आरोपांचे सत्र सुरू झाल्यानंतर तो अस्वस्थ होतो. त्याला माझाही अपवाद नाही, असेही स्पष्टीकरण ख्वाजाने दिले. पाकिस्तानी तसेच विंडीजचे कृष्णधवलवर्णीय खेळाडू हे नेहमीच स्वार्थी असतात आणि ते केवळ आपलाच विचार करतात. संघाची त्यांना कोणतीच काळजी नसते, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळामध्ये केली जाते. पर्थच्या सामन्यावेळी ख्वाजावर जोरदार टीका करण्यात आली होती. सराव सत्रामध्ये सहभागी न झाल्याने आपल्यावर ही टीका करण्यात आली. दरम्यान यावेळी आपण गोल्फ खेळण्यावर भर दिला होता. दरम्यान गोल्फ खेळल्यामुळे पाठदुखी निर्माण झाली, अशी टीका काही समालोचकांनी माझ्यावर केली होती, असे स्पष्टीकरण ख्वाजाने दिले.
उस्मान ख्वाजाने आपल्या वैयक्तिक कसोटी क्रिकेटमध्ये 87 कसोटीत 43.49 धावांच्या सरासरीने 6206 धावा जमविल्या असून त्यात 16 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रामध्ये ख्वाजाचे योगदान निश्चितच महत्त्वाचे असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी म्हटले आहे. 2023 साली ऑस्ट्रेलियन संघाने आसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आणि उस्मान ख्वाजाची या वर्षामध्ये सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती.