तंत्रज्ञान-खनिजांचा अस्त्ररुपी वापर चुकीचा
ब्रिक्स परिषदेवेळी पंतप्रधान मोदींचा चीनला अप्रत्यक्ष संदेश : जिनपिंग-पुतीन यांच्या उपस्थितीत भाषण
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तंत्रज्ञान अन् दुर्लभ खनिजांचा अस्त्राप्रमाणे वापर चुकीचा असून यामुळे जागतिक प्रगती प्रभावित असल्याचे उद्गार काढले आहेत. महामारी, हवामान आपत्ती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांनी जगातील देश एकमेकांशी जोडले गेलेले असल्याचे दाखवून दिले आहे. एका ठिकाणी आलेले संकट दुसऱ्या देशांनाही प्रभावित करू शकते असे म्हणत मोदींनी ब्रिक्स देशांना परस्पर सहकार्य वाढविणे आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण करण्याचे आवाहन केले. सहकार्य आणि विविधतेचा जल्लोष करत ब्रिक्स परिषदेचा समारोप करण्यात आला.
ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात भारत मंडपममध्ये सदस्य देशांच्या नेत्यांचे ग्रूप फोटोसेशन झाले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका बाजूला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तर दुसऱ्या बाजूला रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन उभे होते.
ब्रिक्सचे शक्ती आमची विविधता आणि सहकार्यात आहे. ब्रिक्समध्ये ग्लोबल साउथच्या देशांचा विश्वास वाढला आहे, कारण ब्रिक्समध्ये त्यांचा आवाज ऐकला जातो, त्यांच्या अनुभवाचा सन्मान होतो आणि उपाय त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांच्यासोबत मिळून केले जातात असे मोदींनी परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे.
सध्याच्या इंटरकनेक्टेड जगात कुठलेही संकट एका क्षेत्रापर्यंत मर्यादित राहत नाही. आव्हानांना वेळीच ओळखणे, त्यांच्यासाठी तयार राहणे आणि त्वरित कारवाई करणेही तितकेच आवश्यक आहे. सध्या जगात तणावांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि लोकांच्या जीवनावर याचा अत्यंत नकारात्मक प्रभाव पडत असल्याचे मोदी म्हणाले.
सर्वांना सोबत घेत वाटचाल
महामारी, हवामान आपत्ती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांनी आजच्या इंटरकनेक्टेड जगात कुठलेही संकट एका क्षेत्रापर्यंत मर्यादित राहत नसल्याचे दाखविले आहे. याचमुळे आम्ही ब्रिक्स समुहात अनेक पावले उचलली आहेत. तंत्रज्ञान आणि दुर्लभ खनिजांचे अस्त्राrकरण आमच्या संयुक्त प्रगतीत अडथळे ठरू शकते. याचमुळे आम्ही तंत्रज्ञान अवलंबिण्यात सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्यावर जोर दिला असल्याचे वक्तव्य मोदींनी केले.
मैत्री, सहभाग अन् सहकार्य
भारताने ब्रिक्सच्या व्यासपीठावरून मैत्री, सहभाग आणि सहकार्याला पुढे नेले आहे. ब्रिक्स सहकार्य केवळ सरकारांपुरती मर्यादित राहू नये असा आमचा प्रयत्न आहे. आमचे उद्योजक, शेतकरी, संशोधक, महिला, युवा याचे सक्रीय भागीदार व्हावेत. ब्रिक्समध्ये विकसित तोडग्याचा लाभ केवळ ब्रिक्सपर्यंत मर्यादित राहू नये. त्यांना ग्लोबल साउथच्या आवश्यकतांनुसार अवलंबिण्याची आवश्यकता असल्याचे मोदी म्हणाले.
एआयशी शेतकऱ्यांना जोडण्याचा पुढाकार
ब्रिक्स नेटवर्क ऑन डिजिटल अॅग्रिकल्चरमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण होतील. या पुढाकाराद्वारे एआय, जियोस्पेशियल तंत्रज्ञान आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरला शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडले जाईल. तंत्रज्ञानाचा वापर थेट शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित आवश्यकतांच्या तोडग्यात व्हावा असा उद्देश असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक अंश
-संसर्गजन्क आजारांना रोखण्यासाठी इंटीग्रेटेड अर्ली वॉर्निंग सिस्टीमवर सहमती
-कुठल्याही आव्हानाची वेळीच ओळख पटवत त्वरित उपाययोजना आवश्यक
-इन्क्यूबेटर नेटवर्कद्वारे ब्रिक्स देशांच्या स्टार्टअप, इन्क्यूबेटर्सना जोडण्याचा पुढाकार
-ब्रिक्स लॉजिस्टिक सप्लाय चेन कोऑपरेशन प्रेमवर्कमुळे पुरवठासाखळी विश्वासार्ह
-तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक देश अन् लोकांपर्यंत पोहोचविण्यावर जोर देण्यात यावा.
-ग्लोबल साउथची तंत्रज्ञान विकास अन् त्याच्याशी निगडित नियम निश्चित करण्यात समान भागीदारी असावी.
शक्तिशालीचा अर्थ बरोबर असा नाही
ब्रिक्स परिषदेत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ग्लोबल साउथच्या वाढत्या भूमिकेवर जोर दिला. जर कुणी शक्तिशाली आहे, याचा अर्थ तो नेहमी योग्य असेल असा नाही. जग सध्या एक शतकात न पाहिलेल्या बदलांना सामोरे जातेय आणि ग्लोबल साउथ आता जगाला बहुध्रवीय करण्यासाठी मोठी शक्ती ठरले आहे. नियमांशिवायचे जग ट्रॅफिक लाइट नसलेल्या चौकाप्रमाणे असून तेथे अराजकता निश्चित आहे. आंतरराष्ट्रीय नियम सर्व देशांनी मिळून तयार करावेत. शक्तिशाली तोच बरोबर ही मानसिकता चालू शकत नाही. सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय कायदे एकसारखे लागू व्हावेत आणि दुहेरी मापदंड असू नयेत असे म्हणत जिनपिंग यांनी एकप्रकारे अमेरिकेला लक्ष्य केले आहे.
चीनचे 5 मोठे पुढाकार : ब्रिक्स सहकार्य मजबूत करण्यासाठी जिनपिंग यांनी 5 पुढाकार मांडले आहेत....
ओपन-सोर्स एआय
व्यापार अन् गुंतवणूक सुलभ करणे
डिजिटल क्षेत्रात सहकार्य
स्मार्ट मॅन्यूफॅक्चरिंग
विज्ञान-तंत्रज्ञान गुणवत्ता विकास
फिलिपाईन्सच्या अध्यक्षांसोबत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियरसोबत द्विपक्षीय बैठक घेतली आहे. तसेच कजाकिस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्ट टोकायेवसोबत मोदींनी द्विपक्षीय चर्चा केली आहे.