For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमेदवाराला बदनाम करण्यासाठी बेकायदा पिस्तूलचा खेळ

01:08 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
उमेदवाराला बदनाम करण्यासाठी बेकायदा पिस्तूलचा खेळ
Advertisement

सांगली येथील तरुणांची कबुली : महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी

Advertisement

बेळगाव : गेल्या आठवड्यात लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली येथील दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. मिरज तालुक्यातील युवक बेकायदा शस्त्र घेऊन बेळगावात कशासाठी आले होते? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी माळमारुती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला बदनाम करण्यासाठी षड्यंत्राचा एक भाग म्हणून ते बेळगावात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

रविंद्र कुंतीनाथ नाईक (वय 37), शाहीद रईसअहमद पटेल (वय 21) दोघेही राहणार लिंगनूर, ता. मिरज अशी त्यांची नावे आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 25 जानेवारी रोजी मध्यरात्री पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावात प्रवेशद्वारावरच त्यांना अटक झाली होती. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी त्यांची कसून चौकशी केली असता बेकायदा शस्त्र घेऊन बेळगावात कशासाठी आले? याचे उत्तर देणे ते टाळत होते. पोलिसांनी शेवटी पोलिसी खाक्या वापरला. त्यावेळी धक्कादायक माहिती उघडकीस आली.

Advertisement

महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील गोपाळपूर मतदारसंघात रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला अडकविण्यासाठी हे षड्यंत्र केल्याचे उघडकीस आले आहे. राजू नामक एका नेत्याने या दोघा जणांजवळ दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे देऊन बेळगावला पाठविले. तुम्ही स्वत:हून पोलिसांच्या जाळ्यात अडका, अशी सूचना देण्यात आली होती. पोलिसांनाही हा प्रकारच विचित्र वाटला. बेकायदा शस्त्रs बाळगणारे पोलिसांपासून लांब पळतात. रविंद्र व शाहीद मात्र जाळ्यात अडकले.

याचे कारण शोधले असता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एक महिला उमेदवार व त्यांच्या समर्थक नेत्याला अडकविण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी हा डाव रचला होता.  पोलिसांना शरण गेल्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवाराचे नाव घेत त्यांच्या घरी आणखी दोन गावठी पिस्तूल आहेत, अशी माहिती देण्याची सूचना केली होती. जेणेकरून बेळगाव पोलीस सोलापूरला पोहोचतील, त्या उमेदवाराच्या घरावर छापा टाकतील, अशी ती व्यवस्था होती. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या मुळात शिरून चौकशी केल्यामुळे यामागचे षड्यंत्र उघडकीस आले आहे.

Advertisement
Tags :

.