जागतिक वेटलिफ्टर चॅम्पियनशिप स्पर्धेत उषा अव्वल
निरुपमा ‘क‘ गटात चौथ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ निंगबो (चीन),
येथे रविवारी झालेल्या आयडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 61 किलो वजनी गटात गट ‘डी‘ मध्ये भारताच्या उषाने अव्वल स्थान मिळविले तर सहकारी निरुपमा देवीसाठी ही निराशाजनक कामगिरी ठरली आणि तिला गट ‘सी‘ मध्ये चौथे स्थान मिळाले.
23 वर्षीय उषाने स्नॅचमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो असे एकूण 212 किलो वजन उचलून, आपल्या गटातील सर्व लिफ्टर्स आणि उच्च गट ‘क‘ मधील अनेक स्पर्धकांनाही मागे टाकले. 63 किलो वजनी गटातून खाली आलेल्या निरुपमाने, प्रवेशावेळी जास्त वजन उचलल्यामुळे गट ‘क‘ मध्ये स्थान मिळूनही, एकूण 211 किलो (91 किलो व 120 किलो) वजन उचलले. तिचे वजन उषाच्या कामगिरीपेक्षा एक किलोने कमी होते. गट ‘क‘ आणि ‘ड‘ पूर्ण झाल्यानंतर, उषा एकूण तिसऱ्या तर निरुपमा पाचव्या स्थानावर होती. गट ‘अ‘ पूर्ण झाल्यावर त्यांची अंतिम क्रमवारी अद्ययावत केली जाईल.
उषाने 90 किलोचा स्नॅच यशस्वीपणे उचलून सुरुवात केली, पण पुढच्याच प्रयत्नात तिला 93 किलो उचलण्यात अपयश आले. मात्र, या भारतीय खेळाडूने स्वताला सावरत तिसऱ्या आणि अंतिम स्नॅच प्रयत्नात तेच वजन यशस्वीपणे पार केले. क्लीन अँड जर्कमध्येही उषाने तीनपैकी दोन प्रयत्न यशस्वीरीत्या पूर्ण केले. 115 किलो आणि 119 किलो यशस्वीपणे उचलल्यानंतर, 121 किलोच्या तिच्या अंतिम प्रयत्नात ती अपयशी ठरली.
दुसरीकडे, निरुपमाने किमान दोन यशस्वी लिफ्ट्स पूर्ण करून जेमतेम एकूण वजन नोंदवले. तिने स्नॅचमध्ये 91 किलो वजनाचा अयशस्वी प्रयत्न करून सुरुवात केली, पण दुसऱ्या प्रयत्नात ते वजन उचलण्यात यशस्वी झाली; मात्र तिसऱ्या प्रयत्नात ती 93 किलो वजन पार करू शकली नाही. क्लीन अँड जर्कमध्ये, तिने 120 किलो वजन उचलले, पण 124 किलो उचलण्याचे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, गट ‘अ‘ मध्ये सर्वाधिक घोषित प्रवेश एकूण वजन (स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये उचलण्याचा त्यांचा एकत्रित उद्देश) असलेले लिफ्टर्स असतात, तर गट ‘ब‘, ‘क‘ आणि ‘ड‘ मध्ये उत्तरोत्तर कमी प्रवेश एकूण वजन असलेले खेळाडू असतात. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता प्रणालीच्या पहिल्या टप्प्यातील सहा स्पर्धांपैकी एक आहे.
