जिल्ह्यातील सर्व यात्रांमध्ये शुद्ध भंडारा वापरा
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून आदेश जारी : उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
बेळगाव : जिल्ह्यातील विविध ठिकाणी यात्रा-जत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेषत: सौंदत्ती यल्लम्मा देवी, चिंचली मायाक्का देवी, कक्केरी बिष्टम्मा देवी, कोकटनूर यल्लम्मा देवीच्या यात्रेसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा-जत्रा होतात. यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यानुसार भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रांमध्ये भेसळ भंडारा न वापरता शुद्ध भंडाऱ्याचा वापर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे.
यात्रा व जत्रांसाठी तयार करण्यात येणाऱ्या भंडाऱ्यात हानिकारक रसायने, कृत्रिम रंग, अशुद्ध पदार्थ, असुरक्षित अन्नपदार्थांचा वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन सार्वजनिक शांतताही भंग होते. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रसायन मिश्रीत भंडाऱ्याच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही यात्रेमध्ये रसायन मिश्रीत व असुरक्षित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी पाहणी करावी
जिल्हा नियुक्त अधिकारी, अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरण, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी, स्थानिक तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांनी सदर यात्रांच्या ठिकाणाला भेट देऊन तपासणी करावी. आदेशानुसार उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. संबंधित यात्रा कमिटी किंवा कार्यक्रम आयोजकांनी सदर आदेशाचे पालन करणे व अंमलबजावणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शहर पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुखांनी आवश्यक ते सर्व करावे, असेही आदेशात म्हटले आहे.