पालींचा उपयोग नशेसाठी
अंमली पदार्थसेवनाचे व्यसन माणसाला त्याचा गुलाम बनविले, ही वस्तुस्थिती आहे. अंमली पदार्थ उपलब्ध नाहीत, अशा स्थानीही हे नशेडी लोक विविध क्लृप्त्यांच्या माध्यमातून नशेचे तलफ भागविण्याचा प्रयत्न करतात. अलिकडच्या काळात असाच एक धक्कादायक प्रकार देशातील अनेक कारागृहांमध्ये उघडकीस आला आहे. कारागृहांमध्ये अंमली पदार्थ मिळत नाहीत. पण जे बंदी या पदार्थांच्या सेवनाशिवाय राहू शकत नाहीत, ते कारागृहात विपुल संख्येने असणाऱ्या पालींचा उपयोग अंमली पदार्थ म्हणून करतात आणि आपली तलफ भागवितात असे दिसून आले आहे. त्यामुळे कारागृह अधिकाऱ्यांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे.
कारागृहातील बंदी पालींचा उपयोग अंमली पदार्थाप्रमाणे कसा करतात, याचाही उलगडा झाला आहे. प्रथम ते पालीला पकडतात. नंतर तिची शेपटी तोडतात. या शेपट्या उन्हात वाळविल्या जातात. त्या वाळल्यानंतर त्यांचे चूर्ण केले जाते आणि हे चूर्ण हाच या बंदींचा अंमली पदार्थ असतो. पालीच्या शेपटीत नशा आणणारे द्रव्य असते, हे बऱ्याच काळापासून संशोधकांना माहीत आहे. तथापि, कारागृहातील बंदी ही शिक्कल लढवितील, अशी कल्पना आतापर्यंत कोणी केली नव्हती. तथापि, आता ही वस्तुस्थिती म्हणून समोर उभी राहिली आहे. इतकेच नव्हे, तर कारागृहाबाहेरुनही हे पालींच्या शेपट्यांचे चूर्ण कारागृहातील बंदींना पुरविण्यात येते, ही बाबही उघड झाली आहे. यासंबंधी तपास करण्यात आला, तेव्हा अनेक बंदींनीच या प्रकाराची महिती दिली. पालीच्या शेपटीचे चूर्ण (किंवा पावडर) गांजासारखी तीव्र नशा देते, ही बाब या बंदींनीच अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली.
कारागृहांमधून पालींचा पूर्णपणे नायनाट करणे अशक्य आहे. कारण तसे प्रयोग यशस्वी झालेले नाहीत. बंदींना प्रबोधनाच्या माध्यमातून पालींपासून दूर ठेवणे आणि बाहेरुन त्यांना हे चूर्ण मिळत असेल, तर त्यावर बंदी घालणे हे दोन उपाय केले जात आहेत. काही कारागृहांमध्ये रात्रीच्या गस्तीच्या वेळी काही बंदी अत्यंत उत्तेजित आणि बेचैन अवस्थेत आढळल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे पालींच्या शेपट्यांचे चूर्ण आढळले. त्यामुळे आता कारागृहांच्या आतील घडामोडींवर अधिक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.