कॅन्टोन्मेंटमधील खुल्या जागांचा वापर पार्किंगतळासाठी
दोन ठिकाणांसाठी मागविल्या निविदा
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने खुल्या जागांचा वापर आता पार्किंगतळांसाठी करण्यास सुरुवात केली आहे. खुल्या जागांसाठी कॅन्टोन्मेंटने निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे खुल्या जागांमधूनही कॅन्टोन्मेंट बोर्डला आता महसूल उपलब्ध होणार आहे. फिश मार्केट समोरील खुल्या जागेत पार्किंगतळ उभारले जाणार आहे. याबरोबरच इस्लामिया स्कूलच्या जवळील खुल्या जागेतही पार्किंगतळ उभारून वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. शहरातील वाढती गर्दी पाहता पार्किंगतळ आवश्यक आहे. पार्किंगतळाची गरज ओळखून कॅन्टोन्मेंटने खुल्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-टेंडरिंगद्वारे निविदा मागविण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महसूल वाढीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीत जास्त वेळ पार्किंग करणाऱ्यांना वाढीव शुल्क त्याबरोबरच खुल्या जागांचा वापर पार्किंगतळासाठी केला जाणार आहे. कॅन्टोन्मेंटचे महसूल वाढीसाठी प्रयत्न सुरू असले तरी या ई टेंडरिंग प्रक्रियेला मागील वेळेस तितकासा प्रतिसाद मिळू शकला नव्हता. त्यामुळे यावेळी तरी निविदेला प्रतिसाद मिळणार का? हे पहावे लागणार आहे.