कबाबमध्येही कृत्रिम रंगाचा वापर निषिद्ध
अन्न सुरक्षा खात्याचा आदेश : आरोग्यावर विपरित परिणाम
प्रतिनिधी/ बेंगळूर
गोबी मंच्युरी, कॉटन कॅन्डीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातल्यानंतर राज्य सरकारने आता कबाबमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना अन्न सुरक्षेबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मासे, चिकन कबाब व तत्सम खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालणारा आदेश अन्न सुरक्षा खात्याने जारी केला आहे. काही खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने यापूर्वी गोबी मंच्युरी आणि कॉटन कॅन्डीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती.
आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी अन्न सुरक्षा खात्याच्या आयुक्तांना चिकन कबाबमध्ये कृत्रिम रंग मिसळल्याने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. निकृष्ट दर्जाच्या आहार पदार्थांच्या सेवनामुळे अलीकडे लोकांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक पदार्थाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे, अशा सूचना मंत्री दिनेश गुंडूराव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यभरात विक्री होणाऱ्या कबाबची गुणवत्ता चाचणी करण्यात आली. चिकन कबाब कृत्रिम रंगामुळे खराब होत असून त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन अन्न सुरक्षा आयुक्तांनी चिकन कबाब आणि माशांपासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.
व्हेज/चिकन/फिश कबाब तयार करताना कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचे प्रयोगशाळेच्या चाचण्यांद्वारे सिद्ध झाले आहे. या कृत्रिम रंगांचा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने राज्यभरात व्हेज/चिकन/फिश कबाब तयार करताना कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यभरातून 39 कबाबचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवले असता, 8 नमुने कृत्रिम रंगामुळे असुरक्षित असल्याचे आढळले, अशी माहिती आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी ट्विटरवर दिली आहे.
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (फूड प्रॉडक्ट्स स्टँडर्ड्स अँड फूड एडिटीव्ह) रेग्युलेशन्स,-2011 नुसार कोणतेही कृत्रिम रंग वापरता येणार नाहीत. कबाब तयार करताना कोणत्याही कृत्रिम रंगांना परवानगी नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियमांच्या उल्लंघन प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा-2006 च्या नियम 59 नुसार 7 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि 10 लाख ऊपयांपर्यंत दंड ठोठावण्यासाठी न्यायालयात खटले दाखल केले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.