बंदी तरीही अँथ्रोपिक एआयचा वापर
अमेरिकेच्या सैन्याकडून अवलंब
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज एआय कंपनी अँथ्रोपिकच्या एआय मॉडेलचा सरकारी कामकाजात वापर करण्यावर बंदी घातली आहे. परंतु अमेरिकेच्या सैन्याने अँथ्रोपिक तंत्रज्ञानाचा वापर इराणवरील भीषण हवाई हल्ल्यांसाठी केला आहे. ट्रम्प यांच्या आदेशाच्या काही तासांनीच अमेरिकेच्या मध्य कमांडने इराणविरोधी सैन्य कारवाईत अँथ्रोपिकच्या क्लाउडे एआयचा वापर केला.
का झाला वापर
अमेरिकेच्या सैन्याने इराणवर हल्ल्यादरम्यान इंटेलिजेन्स असेसमेंट, टार्गेटची ओळख पटविणे आणि युद्धस्थितींचे डिजिटल सिम्युलेशन तयार करण्यासाठी क्लाउडे एआयची मदत घेतली. याचबरोबर व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्याच्या हाय-प्रोफाइल मिशनमध्येही पेंटागॉनने याच एआयचा वापर केला होता. सैन्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक ठरले असून ते त्वरित हटविणे शक्य नसल्याचे जाणकारांचे सांगणे आहे.
फेज आउट टाइममध्ये वापराचा हक्क
ट्रम्प यांनी अँथ्रोपिकला ‘लेफ्टविंग नट जॉब्स’ आणि ‘वोक’ कंपनी संबोधिले होते. याचबरोबर कंपनीला सैन्याच्या कामात हस्तक्षेप करणारी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादाय ठरविण्यात आले होते. अँथ्रोपिकच्या तंत्रज्ञानाचा वापर त्वरित बंद करण्यात यावा असा आदेश त्यांनी सर्व संघीय यंत्रणांना दिला होता. परंतु युद्ध विभागासारख्या यंत्रणांना याकरता 6 महिन्यांचा कालावधी फेज आउटसाठी देण्यात आला होता. अमेरिकेच्या सैन्याच्या एआयवरील निर्भरतेमुळेच ट्रम्प यांना अँथ्रोपिकचे तंत्रज्ञान त्वरित बंद करण्याऐवजी काही कालावधी द्यावा लागला.
अँथ्रोपिकला नाही पर्याय
ट्रम्प यांच्या आदेशानंतरही सैन्याकडून अँथ्रोपिकचा झालेला वापर पाहता सैन्याला या तंत्रज्ञानाचा पर्याय शोधता आलेला नसल्याचे स्पष्ट होते. पेंटागॉनकडे आता केवळ 6 महिन्यांची मुदत असल्याने सॅम ऑल्टमॅन यांच्या ओपनएआयसोबत करार झाला आहे. परंतु अमेरिकेच्या सैन्याला अँथ्रोपिकच्या जागी ओपनएआय किती पसंत पडते हे पुढील काळातच समजणार आहे.