देशाच्या समृद्धीसाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करा
रिअर अॅडमिरल विक्रम मेनन यांचे प्रतिपादन : व्हीटीयूचा 25 वा दीक्षांत सोहळा : एकूण 8702 पदवीधर सन्मानित
बेळगाव : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्याला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अभियंत्यांनी प्रयत्न करावेत. हवामान बदलापासून आरोग्य सुविधा सुधारण्यापर्यंत सर्वच ठिकाणी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. त्यामुळे अभियांत्रिकी ज्ञानाचा योग्य वापर करून देशाची समृद्धी साधावी, असे विचार कर्नाटका नावल विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल विक्रम मेनन यांनी मांडले. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) चा 25 वा वार्षिक दीक्षांत सोहळा भाग-2 सोमवारी व्हीटीयूच्या कॅम्पसमध्ये पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल थावरचंद गेहलोत, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये एकूण 8702 पदवीधरांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. ते पुढे म्हणाले, खरे नेतृत्त्व म्हणजे केवळ नवोपक्रम नसून नैतिक जबाबदारी, संघ भावना व सेवा असा आहे. करिअरच्या दिशेने तुम्ही पाऊल टाकत आहात. त्यावेळी धैर्याने समोरच्या आव्हानांचा सामना करा.
व्हीटीयू तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर आहे. एआय, सायबर सुरक्षा यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश विद्यापीठात असल्यामुळे यातून तयार झालेले विद्यार्थी उत्तुंग यश मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपाल थावरचंद गेहलोत म्हणाले, सर विश्वेश्वरय्या यांच्या विचारांवर आधारलेले हे विद्यापीठ आहे. तंत्रज्ञानाने सामान्य लोकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. कर्नाटक राज्याने नेहमीच ज्ञान, नवोपक्रम यामध्ये आघाडीची भूमिका बजावली आहे. माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान या क्षेत्रामध्ये राज्य देशात आघाडीवर आहे. विकसित भारत साध्य करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या या यशामध्ये पालक, प्राध्यापक व विद्यापीठाचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. या दीक्षांत समारंभामध्ये एकूण 8702 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. यापैकी 96 विद्यार्थ्यांनी रँक मिळविले तर 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. कुलगुरु डॉ. एस. विद्याशंकर म्हणाले, 83 हजार विद्यार्थ्यांनी आजवर इंटर्नशीप घेतली आहे. अनेक कंपन्यांशी करार असल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन हजार पदे लवकरच भरली जाणार
राज्यातील उच्चशिक्षण विभागात रिक्त असलेल्या प्राध्यापक व प्राध्यापकेतर पदांचा समावेश आहे. यापैकी 2 हजार पदे लवकरच भरली जाणार आहेत, ज्यामध्ये सरकारी अभियांत्रिकीमध्ये 186, पॉलिटेक्निकमध्ये 941, महाविद्यालयीन विभागात 826 यासह इतर पदे भरली जाणार आहेत. व्हीटीयूमध्ये आशियाई विकास बँकेच्या मदतीने एक्सलन्स सेंटर सुरू केले जाणार असल्याचे राज्याचे उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी सांगितले.