पत्ता शोधण्यासाठी ‘पिन कोड’ ऐवजी ‘डिजिपिन’
रत्नागिरी :
घरी डिलिव्हरी मागवणार असाल, कुणाला पार्सल पाठवणार असाल किंवा पत्र लिहिणार असाल तर आता पिन कोडची आवश्यकता नाही. भारतीय टपाल विभागाने डिजिपिन(DIGIPIN ) सेवा सुरू केली आहे, जी तुमच्या स्थान निर्देशांकांवर आधारित डिजिटल पिन कोड तयार करेल. त्यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यातला पत्ता शोधणे अगदी सोपे होणार असून कुरिअर किंवा पार्सल योग्य पत्त्यावर जाण्यास मदत होणार आहे, अशी माहिती रत्नागिरीतील डाक अधीक्षक ए. डी. सरंगळे यांनी दिली.
आपण सध्या पत्र पाठवण्यासाठी वापरतो तो पिन कोड 6 आकडी असतो. भारतातील कोणत्याही क्षेत्राला डाक विभागाने दिलेली ती ओळख असते. परंतु आपण पाठवलेले पत्र एखाद्याला अचूकपणे पोहोचवता यावे म्हणून डिजिपिन नावाची नवी ओळख भारतीय डाक विभागाने तयार केली आहे.
सध्या देशात अशी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही, जिच्या मदतीने घराचा अचूक पत्ता सहजपणे शोधता येईल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्याने तयार करण्यात येणारा डिजिटल पत्ता आयडी अनेक बाबतीत उपयुक्त ठरणार आहे. हे आयडी एकप्रकारे घराचाच आधार क्रमांक असणार आहेत.
- 10 आकड्यांचा डिजिपिन
खूप मोठा परिसर दर्शवणाऱ्या 6 अंकी पिनकोड ऐवजी अचूक स्थान दर्शवणारा 10 आकड्यांचा डिजिपिन लवकरच वापरात येईल. तुम्हाला तुमच्या घराचा डिजिपिन हवा असेल तर डिजिपिनच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन नोंदवू शकता. त्यानंतर सिस्टीम तुम्हाला 10 अंकी किंवा अक्षरी युनिकोड देईल. हा पत्ता तुमचा डिजिपिन असेल. हा कोड अचूक स्थान दर्शवतो. भविष्यात भारतीय डाक खात्याच्या सेवा ऑनलाईन डिलिव्हरी आणि सरकारी यंत्रणा याच डिजिपिनचा वापर करतील, असे सरंगळे म्हणाले.
भारतीय डाक खात्याने आयआयटी हैद्राबाद आणि इस्रो सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीअंतर्गत देशाला 4 बाय 4 मीटरच्या छोट्या आकारात विभाजीत करण्यात आले आहे. प्रत्येक भागाला एक युनिक आयडी देण्यात आला आहे. हा दहा अक्षरांचा समूह असेल. त्याला डिजिपिन असे म्हटले जाते. हा कोड अक्षांश आणि रेखांशावर आधारीत असेल.
- डिजिपिनचा कसा उपयोग होणार?
डिजिपिनचा उपयोग फक्त कुरियर आणि पार्सल डिलिव्हरीपुरता मर्यादित नाही. याचा वापर आपत्कालीन सेवांसाठी देखील होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तुमचा डिजिपिन शेअर करून पोलीस, ऊग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला तातडीने मदत मागवू शकता. डिजिपिनमुळे तुमचे अचूक स्थान शोधणे या सेवांना सोपे होईल. याशिवाय, डिजिपिनचा वापर लॉजिस्टिक्स, कुरियर डिलिव्हरी आणि अगदी कॅब बुकिंगसाठीही करता येईल.
- डिजिपिन कसा तयार कराल?
इंडिया पोस्टची अधिकृत वेबसाइट https://dac.indiapost.gov.in/mydigipin/homes:// वर जा.
- तुमच्या डिव्हाइसला लोकेशन अॅक्सेस द्या, जेणेकरून तुमच्या अचूक स्थानावर आधारित डिजिपिन तयार होईल.
- लोकेशन परवानगी दिल्यानंतर तुमचा 10-अंकी डिजिपिन तात्काळ तयार होईल.
- हा डिजिपिन तुम्ही कुरियर डिलिव्हरी, आपत्कालीन सेवा, लॉजिस्टिक्स किंवा कॅब बुकिंगसाठी वापरू शकता.