अमेरिकेकडे युनायटेड टेनिस चषक
युनायटेड चषकासह अमेरिकन टेनिस संघ
वृत्तसंस्था/ सिडनी
रविवारी येथे झालेल्या युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद अमेरिकेने पटकाविले. अमेरिकेने अंतिम लढतीत पोलंडचा पराभव केला. अमेरिकेच्या विजयामध्ये कोको गॉफची कामगिरी महत्त्वाची ठरली.
या अंतिम लढतीतील महिला एकेरीच्या सामन्यात कोको गॉफने पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकचा पराभव केला. तर अमेरिकेच्या टेलर फ्रिझने पोलंडच्या हुरकेझवर मात करुन चषकावर आपल्या संघाचे नाव कोरले. महिला एकेरीच्या सामन्यात गॉफने स्वायटेकचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना सुमारे 110 मिनिटे चालला होता. दुसऱ्या एकेरी सामन्यात टेलर फ्रिझने हुरकेझचे आव्हान 6-4, 5-7, 7-6 (7-4) असे संपुष्टात आणले. गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत अमेरिकेने ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. 2023 साली पहिल्यांदा सुरु झालेल्या या स्पर्धेचे जेतेपद अमेरिकेने पटकाविले होते. पोलंड संघाला सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी या स्पर्धेत जर्मनीने पोलंडचा पराभव केला होता.