अमेरिका, जपान अंतिम फेरीसाठी पात्र
वृत्तसंस्था / ब्रेटीस्लेव्हा (स्लोव्हाकिया)
बिलीजीन किंग चषक महिलांच्या सांघिक टेनिस स्पर्धेत अमेरिका आणि जपान यांनी अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली. अमेरिकेने यजमान स्लोव्हाकियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. तसेच जपानने कॅनडाचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
अमेरिका आणि स्लोव्हाकिया यांच्यातील सामन्यात पहिल्या एकेरीच्या सामन्यात बॅप्टिस्टीने रिनेटा जेमीरिचोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव करत अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अमेरिकेच्या पेराने स्लोव्हाकियाच्या रिबेका श्रेमकोव्हावर 7-6 (7-2), 7-5 अशी मात करत आपल्या संघाची आघाडी 2-0 अशी वाढविली. स्लोव्हाकियातर्फे एकमेव दुहेरी सामना जिंकल्याने अमेरिकेने ही लढत 2-1 अशा फरकाने जिंकली. गेल्या शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या क गटातील सामन्यात अमेरिकेने डेन्मार्कचा 3-0 असा पराभव करत या गटात आघाडीचे स्थान मिळविले होते.
दुसऱ्या लढतीमध्ये जपानच्या सिबाहेरा आणि अयोमा यांनी दुहेरीच्या सामन्यात कॅनडाच्या कायला क्रॉस आणि रिबेका मॅरीनो यांचा 4-3, 5-7, 6-2 असा पराभव करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी अ गटातील पहिल्या एकेरीच्या सामन्यात कॅनडाला मिबेकोने आघाडीवर नेताना सिबाहेराचा 6-4, 6-7 (6-8), 7-5 असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात जपानच्या युचीजिमाने कॅनडाच्या स्टेकुसीकवर 6-3, 6-3 अशी मात करत आपल्या संघाला कॅनडाशी बरोबरी साधून दिली होती. येत्या सप्टेंबरमध्ये शेनझेन येथे बिलीजीन किंग सांघिक स्पर्धेतील फायनल्स खेळविली जाणार आहे. जपानने या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.