For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिका बाहेर

07:00 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिका बाहेर
Advertisement

युएनच्या 31 संस्थांमधून घेतला काढता पाय : जागतिक आरोग्य संघटनेचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेला अधिकृतपणे बाहेर काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात 36 बिगर संयुक्त राष्ट्रसंघ संघटना आणि 30 संयुक्त राष्ट्रसंघ संस्था सामील आहेत. या संघटना अमेरिकेच्या हितांच्या विरोधात असून तेथे निधीचा दुरुपयोग होतो. याचबरोबर या संघटना अनावश्यक किंवा खराबप्रकारे चालविल्या जात असल्याचा आरोप व्हाइट हाउस आणि विदेश विभागाने केला आहे. या निर्णयाला ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा हिस्सा ठरविले जात असून ते जागतिक संस्थांपासून अंतर राखण्यावर जोर देणारे आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडणार असल्याची घोषणा केली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून बाहेर पडण्यासाठी एक वर्षाच नोटीस कालावधी आवश्यक असतो. यामुळे 22 जानेवारीनंतर अमेरिका आता जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नसेल.

Advertisement

हवामान बदल करारातून काढता पाय

संयुक्त राष्ट्रसंघाच्या फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन क्लायमेट चेंजमधून अमेरिका बाहेर पडणार अहे. हा 1992 चा करार असून तो जगातील सर्व देशांना जोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करतो. हा करार पॅरिस हवामान करारासाठीही महत्त्वपूर्ण आहे, ज्यातून अमेरिका बाहेर पडणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी यापूर्वीच केली आहे. याचबरोबर इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज यासारख्या महत्त्वपूर्ण हवामानविषयक संस्थांमधूनही अमेरिका बाहेर पडणार आहे.

हरितवायू उत्सर्जनात दुसऱ्या स्थानी

अमेरिकेच्या या निर्णयामुळे हवामान विषयक जागतिक प्रयत्नांना मोठा झटका बसणार आहे. अमेरिका हा जगातील दुसरा सर्वात मोठा हरितवायू उत्सर्जक देश आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे इतर देशांना स्वत:ची हवामान प्रतिबद्धता टाळणे आणि मनमानी करण्याचे कारण मिळू शकते.

दशकांची मेहनत वाया जाणार

ट्रम्प यांच्या या निर्णयावर कठोर टीका होतेय. जो बिडेन यांच्या प्रशासनाच्या हवामान सल्लागार राहिलेल्या जीना मॅकार्थी यांनी या निर्णयाला कमकुवत विचारांचा, लाजिरवाणा आणि मूर्खतेचा ठरविले आहे. आता युएनएफसीसीसीचा हिस्सा नसलेला जगातील एकमात्र देश अमेरिका असेल, यमुळे दशकांचे अमेरिकन हवामान नेतृत्व आणि जागतिक सहकार्य धूळीला मिळणार आहे. यामुळे अमेरिका ट्रिलियन्स डॉलर्सची गुंतवणूक, धोरणे आणि निर्णयांना प्रभावित करण्याची क्षमता गमावणार असल्याचा दावा मॅकार्थी यांनी केला.

ट्रम्प यांचा आरोप

संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या एजेन्सीमधून अमेरिकेला बाहेर काढण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. ही संस्था जगभरात लैंगिक अणि प्रजनन आरोग्य सेवा प्रदान करते. रिपब्लिकन पार्टी आणि ट्रम्प यांनी यापूर्वी या संस्थेवर चीनसारख्या देशांमध्ये ‘बळजबरीच्या गर्भपाता’ला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता. परंतु बिडेन प्रशासनाच्या काळात झालेल्या चौकशीत अशाप्रकारचा कुठलाच पुरावा मिळाला नव्हता. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात याचा निधी रोखण्यात आला होता.

भारताच्या नेतृत्वाखालील संघटना

भारताच्या नेतृत्वाखालील संघटना इंटरनॅशनल सोलर अलायन्सही प्रभावित होणार आहे. 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी या संघटनेची स्थापना केली होती. अमेरिकेने या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल कॉटन एडव्हायजरी कमिटी, इंटरनॅशनल ट्रॉपिकल टिंबर ऑर्गनायजेशन, कार्बन फ्री एनर्जी कॉम्पॅक्ट आणि अनेक सांस्कृतिक तसेच पर्यावरणविषयक संस्थांमधून अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Tags :

.