अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतात येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हान्स लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांचा हा भारत दौरा या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा दौरा झाल्यास तो व्हान्स यांचा उपराष्ट्राध्यक्ष झाल्यापासूनचा दुसरा विदेश दौरा असेल. गेल्या महिन्यात त्यांनी फ्रान्स आणि जर्मनीचा संयुक्त दौरा केला होता.
व्हान्स यांच्या संभाव्य भारत दौऱ्यात आयात करासंबंधीच्या प्रमुख मुद्द्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कर धोरणात व्यापक परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. अमेरिकेच्या वस्तूंवर कॅनडा, मेक्सिको, युरोपियन महासंघ, चीन, भारत, व्हिएतनाम आणि जपान आदी देश प्रचंड कर आकारणी करतात. परिणामी, या देशांना अमेरिका आपला माल मोठ्या प्रमाणात निर्यात करु शकत नाही. गेली अनेक दशके अशी स्थिती असल्याने अमेरिकेला मोठी आर्थिक हानी सोसावी लागली आहे, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची धारणा आहे. त्यामुळे एकतर या देशांनी अमेरिकेच्या वस्तूंवरील कर कमी करावेत, किंवा अमेरिका प्रतिद्वंद्वी कर (रेसिप्रोकल टॅरीफ) लागू करेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.
व्यापक करारासाठी प्रयत्न
अमेरिकेशी व्यापक व्यापार करार करण्याची भारताची इच्छा आहे. त्याकरिता दोन्ही देशांच्या वाणिज्य विभागांमध्ये सध्या चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर गेले होते. भारताने कर कमी करण्याचे मान्य केले आहे, असे प्रतिपादन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. तथापि, अमेरिकेला असा कोणताही शब्द दिलेला नाही, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वतीने भारताच्या संसदेत करण्यात आले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व्हान्स यांच्या संभाव्य भारत दौऱ्याला महत्व देण्यात येते.