विदेशी नागरिकांना अमेरिकेचा अल्टिमेटम
30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे असल्यास नोंदणीची सक्ती : अवैध स्थलांतराबाबत ट्रम्प प्रशासनाचा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने तेथे राहणाऱ्या विदेशी नागरिकांना अल्टिमेटम जारी केला आहे. अमेरिकेत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या विदेशी नागरिकांना विभागाने सरकारकडे नोंदणी करण्यास सांगितले आहे. जर सदर लोकांनी नोंदणी केली नाही तर त्यांना दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो, असा इशारा ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. स्थलांतराची अंमलबजावणी कडक करणे हा या आदेशाचा मुख्य उद्देश आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून बेकायदेशीर स्थलांतरितांवर सतत कारवाई केली जात आहे. आता नोंदणीशिवाय 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना दंड आणि तुरुंगवासासह कठोर शिक्षा भोगाव्या लागतील, असा इशारा अमेरिकन सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांना दिला आहे. यापूर्वी बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसलेल्या विविध देशांमधील शेकडो लोकांना अमेरिकेने माघारी पाठवले होते. अमेरिकेत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी नागरिकांना संघीय सरकारकडे नोंदणी करावी लागते. नियमांचे पालन न करणे हा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा देणारा गुन्हा आहे.
ट्रम्प प्रशासनाचा कडक संदेश
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या ‘एक्स’ अकाउंटवरील पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सचिव नोएम यांच्यामार्फत बेकायदेशीर परदेशी लोकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. या ट्विटमध्ये ‘येथून ताबडतोब तुमच्या देशात माघारी चला’ असे स्पष्टपणे नमूद केले आहे. या पोस्टमध्ये गृह सुरक्षा विभागाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे कार्यालय आणि गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांना टॅग केले आहे.
आदेशामुळे कोणाचे नुकसान होईल?
अमेरिकेने जारी केलेल्या या नवीन निर्णयाचा परिणाम एच-1बी वर्क परमिट किंवा विद्यार्थी व्हिसा सारख्या कायदेशीर व्हिसा धारकांवर तात्काळ होणार नाही. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्हिसाच्या अटींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, अन्यथा त्यांना बेकायदेशीरपणे उपस्थित असल्याचे मानले जाऊ शकते. या नव्या आदेशाचा फटका कायदेशीर व्हिसा नसूनही अमेरिकेत राहणाऱ्यांसाठी तापदायक ठरणार आहे. याशिवाय, नोकरी गमावलेल्यांसाठीही समस्या निर्माण होतील. कारण नोकरी गमावलेले बरेच लोक सूट कालावधीनंतरही अमेरिकेतच राहणे पसंत करतात.
स्वत:हून माघारी निघा!
‘बेकायदेशीर विदेशी लोकांना संदेश’ या मथळ्याच्या पोस्टमध्ये गृह सुरक्षा विभागाने अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राहणाऱ्या परदेशी नागरिकांना स्वत:हून माघारी परतण्यास सांगितले आहे. ‘स्वत:हून निर्वासित होणे सुरक्षित आहे. तुमच्या पसंतीचा प्रवास निवडा आणि निघून जा. जर तुम्ही गैर-गुन्हेगार बेकायदेशीर विदेशी म्हणून स्व-निर्वासित होत असाल तर अमेरिकेत कमावलेले पैसे तुमच्याकडे ठेवा’ असेही सदर निवेदनात म्हटले आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे स्वत:ला डिपोर्ट करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर तो अनुदानित विमान प्रवासाचा पर्याय वापरू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.