For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका व्यापार कराराने शेअर बाजारात उसळी

06:58 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका व्यापार कराराने शेअर बाजारात उसळी
Advertisement

सेन्सेक्स 2 हजार अंकांनी उसळला, निफ्टीची एकाच दिवसात उच्चांकी झेप

Advertisement

मुंबई :

अमेरिकेने भारतासोबतचा व्यापार करार अंतिम केला असून अमेरिका आता 18 टक्के इतका व्यापार शुल्क आकारणार आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर शेअरबाजाराने मंगळवारी मोठी उसळी घेतलेली दिसून आली. सेन्सेक्स, निफ्टी हे निर्देशांक जवळपास 2 टक्केपेक्षा जास्त वाढले होते. निफ्टीने तर 9 महिन्यानंतर एका दिवसात सर्वाधिक इंट्राडे तेजी नोंदवली आहे. रुपयाही 1 रुपयांपेक्षा अधिक तेजीत होता.

Advertisement

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 2071 अंकांनी म्हणजेच 2.54 टक्के झेप घेत 83739 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 639 अंकांनी म्हणजेच 2.55 टक्के वाढत 25727 अंकांवर बंद झाला. सोबत बँक निफ्टी निर्देशांकही तब्बल 1422 अंकांनी उसळी घेत 60041 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला.

ट्रम्प यांनी भारतावरील व्यापार शुल्क 50 टक्क्यावरुन 18 टक्के केल्याने याने शेअरबाजारात मोठी उसळी घेतलेली दिसली. रियल्टी, ऑटो व आयटी समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली दिसली. रियल्टी निर्देशांक 5 टक्के इतका वाढला. तर आयटी व ऑटो यांनी 4 टक्के इतकी तेजी राखली होती. निफ्टी मेटल, फार्मा, हेल्थकेअर व बँक निर्देशांक 3 टक्के तेजीसोबत बंद झाले. निफ्टीतील 50 पैकी 46 समभाग तेजीत होते तर 4 समभाग घसरणीत होते. अदानी समूहातील बरेचसे समभाग मंगळवारी अगदी 13 टक्क्यांवर तेजीत राहताना दिसले आहेत. अदानी ग्रीन व अदानी एंटरप्रायझेसचे समभाग इंट्रा डेदरम्यान 13 टक्के इतके वाढले होते.

निफ्टीत पाहता अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस्, जियो फायनॅन्शीयल, बजाज फायनान्स, इंटरग्लोब एव्हीएशन, मॅक्स हेल्थकेअर यांचे समभाग तेजीत आघाडीवर होते. तर घसरणीत टेक महिंद्रा, बीईएल व नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले होते. मिडकॅपमध्ये पाहता पीबी फिनटेक, केपीआयटी टेक, भारत डायनॅमिक्स, एचपीसीएल, कोचिन शिपयार्ड, टाटा केमिकल्स यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले.

जागतिक बाजारातही बहर

जागतिक बाजारात पाहता आशियाई व अमेरिकेतील बाजारात तेजी होती. जपानचा निक्केई 3.14 टक्के तर दक्षिण कोरीयाचा कोस्पी 5.02 टक्के वाढत व्यवहार करत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.20 टक्के वाढीसोबत तर चीनचा शांघाय कंपोझीट 0.38 टक्के वाढत व्यवहार करत होता. 2 फेब्रुवारीस अमेरिकेतील डोव्ह जोन्स 1.05 टक्के वाढत 49407 वर बंद झाला.

Advertisement
Tags :

.