इस्रायलला 26 हजार कोटीची शस्त्रास्त्रs देणार अमेरिका
900 किलोचे 40 हजार बॉम्ब सामील : ट्रम्प यांच्याकडून मंजुरी
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इस्रायलला 2.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 26 हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रs पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. या पॅकेजमध्ये सुमारे 40 हजार अवजड बॉम्ब सामील असतील. प्रत्येक बॉम्बचे वजन 2000 पाउंड म्हणजेच सुमारे 900 किलो असणार आहे. या बॉम्बचा पुरवठा 2024 साली तत्कालीन अध्यक्ष जो बिडेन यांनी रोखला होता.
प्रस्तावित शस्त्रास्त्र पॅकेजमध्ये 20 हजार एमके84 आणि 20 हजार बीएलयू-117 बॉम्ब सामील आहेत. यासंबंधीच्या करारावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अमेरिकच्या अधिकाऱ्यांनुसार काँग्रेसला याची अनौपचारिक माहिती देण्यात आलेली आहे.
गाझामध्ये जीवितहानी वाढण्याची होती भीती
2024 साली बिडेन प्रशासनाने 2000 पाउंडच्या या बॉम्बची खेप इस्रायलला पाठविण्यास स्थगिती दिली होती. गाझासारख्या घनदाट लोकसंख्या असलेल्या भागात या बॉम्बचा वापर झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते अशी चिंता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. परंतु ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाल्यावर ही स्थगिती हटविण्यात आली आहे. आता त्यांचे प्रशासन याच बॉम्बची मोठी संख्या असलेल्या नव्या कराराची तयारी करत आहे.
जमिनीतील तळ नष्ट करणारा बॉम्ब
या 900 किलोच्या बॉम्बचे वेगवेगळे मॉडेल आहेत, काही बॉम्ब जमिनीच्या आत असलेल्या तळांना लक्ष्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, तर काही बॉम्ब जमिनीवर फुटून मोठ्या भूभागात प्रचंड नुकसान पोहोचवू शकतात. गाझामध्ये अमेरिकेकडून निर्मित बॉम्बचा वापर झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यातील काही बॉम्ब हमासच्या भुयारी नेटवर्कला लक्ष्य करण्यासाठी वापरण्यात गेले होते.
यापूर्वीही अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र
ट्रम्प प्रशासनाने मागील वर्षी इस्रायलसाठी सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रविक्रीला मंजुरी दिली होती. यात 35 हजारांहून अधिक अवजड बॉम्ब सामील होते. तर जानेवारीमध्ये इस्रायसाटी 6.67 अब्ज डॉलर्सच्या आणखी एका शस्त्रास्त्रविक्रीला मंजुरी देण्यात आली.
7 ऑक्टोबरनंतर गाझा युद्ध
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये सुमारे 1200 लोक मारले गेले होते आणि 251 जणांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर इस्रायलने गाझामध्ये सैन्य अभियान सुरू केले होते. इस्रायलच्या सैन्य अभियानामुळे गाझामध्ये आतापर्यंत 73,264 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे संघर्षविराम झाला असला तरीही गाझामधील हिंसा पूर्णपणे बंद झालेली नाही.