सौदी अरेबियाला अमेरिका पुरविणार एफ-35
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा : इस्रायलचे वाढणार टेन्शन
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील स्वत:चा प्रमुख सहकारी देश सौदी अरेबियाला एफ-35 स्टील्थ लढाऊ विमाने पुरविण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियाला एफ-35 लढाऊ विमाने विकण्यास मंजुरी देणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. सौदी अरेबियाला एफ-35 लढाऊ विमाने मिळाल्यास चीनला या अत्याधुनिक यंत्रामागील तंत्रज्ञान मिळू शकते अशी भीती अमेरिकेला आहे.
ट्रम्प यांची ही घोषणा सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या बहुप्रतीक्षित वॉशिंग्टन दौऱ्यापूर्वी झाली आहे. मोहम्मद बिन सलमान यांचा 8 वर्षांमधील पहिलाच अमेरिका दौरा आहे. एफ-35 लढाऊ विमानांची विक्री दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या मोठ्या व्यवहारांपैकी एक आहे. तर सौदीचे युवराज सलमान हे स्वत:च्या दौऱ्यादरम्यान अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजेन्स क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करणार असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
सौदी अरेबियाचे युवराज हे अमेरिकेकडून सुरक्षेची हमी आणि एफ-35 लढाऊ विमानांच्या खरेदीच्या संभाव्य कराराच्या अपेक्षेने वॉशिंग्टनमध्ये दाखल होत आहेत. परंतु एफ-35 लढाऊ विमानावरून अमेरिकेचे प्रशासन सावधपणे पावले टाकत आहे. सौदी अरेबियाला एफ-35 मिळाल्यास क्षेत्रातील इस्रायलच्या सैन्यआघाडीला आव्हान मिळू शकते. इस्रायल देखील अमेरिकन एफ-35 लढाऊ विमानाचा वापर करतो.
अमेरिकेला चीनची भीती
एफ-35 तंत्रज्ञान चीनकडून चोरले जाऊ शकते किंवा कुठल्याही प्रकारे चीनला हे तंत्रज्ञान हस्तांतरित केले जाऊ शकते अशी चिंता दीर्घकाळापासून अमेरिकेला सतावत आहे. याच चिंतेमुळे संयुक्त अरब अमिरातसोबतचा एफ-35 विक्री करार बारगळला होता. चीनचे संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांसोबत घनिष्ठ संबंध आहेत. सौदी अरेबिया आणि चीनने मागील महिन्यात संयुक्त सागरी युद्धाभ्यास केला होता. तसेच सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यास चीनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर सौदी अरेबियाचा पहिल्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार म्हणून चीनने मागील वर्षी अमेरिकेला मागे टाकले होते. परंतु शस्त्रास्त्रांसाठी सौदी अरेबियाची अद्यापही अमेरिकेलाच पसंती आहे.