अमेरिका मोठ्या संख्येत चिनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करणार
कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असल्याचा संशय : राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक निर्णय असल्याचा दावा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेने चिनी विद्यार्थ्यांचा व्हिसा मोठ्या प्रमाणावर रद्द करण्याची घोषणा केली आहे. विदेश मंत्रालय, गृह सुरक्षा मंत्रालयासोबत मिळून हे काम करणार असल्याचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असलेले किंवा तांत्रिक क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या चिनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात चीन आणि हाँगकाँगमधून प्राप्त होणाऱ्या व्हिसा अर्जांची पडताळणी आणखी कठोर करणार आहोत असे त्यानी सांगितले आहे. चिनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहे. चिनी कम्युनिस्ट पक्ष विद्यार्थ्यांद्वारे संवेदनशील माहिती प्राप्त करू शकतो असा अमेरिकेचा दावा आहे. हे पाऊल अमेरिकेत चिनी विद्यार्थ्यांची संख्या कमी करणार आहे. याचबरोबर हा निर्णय दोन्ही देशांदरम्यान असलेला तणाव आणखी वाढवू शकतो. अमेरिकेच्या प्रशासनाने विदेशी विद्यार्थ्यांसाठी नव्या व्हिसा मुलाखतीला स्थगिती दिली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जपान सरकारने देशाच्या विद्यापीठांना अमेरिकेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा विचार करण्याची सूचना केली आहे.
चिनी विद्यार्थी अन् कम्युनिस्ट पक्षाचा संबंध
चिनी कम्युनिस्ट पक्ष हा चीनमधील एकमेव सत्तारुढ पक्ष असून तो देशात शिक्षण, संस्कृती आणि समाजावर मोठा प्रभाव राखून आहे. अनेक चिनी विद्यार्थी हे उच्चशिक्षणासाठी विदेशात जात असून त्यांचा चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असू शकतो. चिनी विद्यापीठांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीला चालना देणारे अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात. तर चिनी कम्युनिस्ट पक्ष विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी विद्यार्थी संघटनांचा वापर करते, असे अमेरिकेच्या प्रशासनाचे मानणे आहे.
चिनी विद्यार्थी हेरगिरीत सामील
काही चिनी विद्यार्थी कम्युनिस्ट पक्षासाठी हेरगिरी किंवा तांत्रिक माहिती चोरण्याचे काम करतात. खासकरून राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील असलेल्या क्षेत्रांमध्ये म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानांच्या बाबतीत हा प्रकार घडत असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे मानणे आहे.
निर्णयाचा पडणारा प्रभाव....
- देश सोडावा लागणार : व्हिसा रद्द झाल्यास चिनी विद्यार्थ्यांना अन्य विद्यापीठात जावे लागू शकते किंवा देश सोडावा लागू शकतो. हार्वर्ड विद्यापीठात 1,203 चिनी विद्यार्थी शिकत असून यातील अनेकांवर प्रभाव पडू शकतो.
- अमेरिकेच्या प्रतिमेवर प्रभाव : हे पाऊल अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला नुकसान पोहोचवेल असा इशारा चीनने दिला आहे. काही चिनी विद्यार्थी आता ब्रिटन किंवा अन्य देशांमध्ये शिक्षणाचा पर्याय शोधत आहेत.
- आर्थिक नुकसान : चिनी विद्यार्थी अमेरिकेच्या विद्यापीठांसाठी महत्त्वपूर्ण उत्पन्नस्रोत आहेत. 2023-24 मध्ये सुमारे 2,78,000 चिनी विद्यार्थ्यांनी अमेरिकन शिक्षणावर 14.3 अब्ज डॉलर्स खर्च केले.
- शैक्षणिक संबंधांमध्ये घट : अमेरिका आणि चीनदरम्यान शैक्षणिक आदान-प्रदान यापूर्वीच कमी होतेय, 2019 मध्ये 3,72,532 चिनी विद्यार्थी अमेरिकेत होते. 2022-23 मध्ये हे प्रमाण कमी होत 2,78,000 वर आले.