For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका करणार इराणची नाकेबंदी

12:54 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका करणार इराणची नाकेबंदी
Advertisement

कठोर निर्बंध लादणार, सहकारी देशांवरही निर्बंध

Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याचा इशारा दिला आहे. इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी सज्जता करण्यात येत आहे. निर्बंधांच्या काळात जे देश इराणला सहकार्य करतील किंवा त्या देशाचा लाभ होईल, असे व्यवहार त्या देशाशी करतील, त्यांच्यावरही आर्थिक निर्बंध लागू करणार असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इराणनेही अमेरिकेचे आव्हान स्वीकारत असल्याचे प्रतिपादन केले असून आम्ही सज्ज आहोत, असे सूचित केलेले आहे.

Advertisement

आगामी काळ इराणसाठी आर्थिक विनाशाचा असेल. इराणला आपल्या तेलाची तसेच इतर उत्पादनांची विक्री करता येणार नाही. कच्चे इंधन तेल, हा इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो मोडण्यासाठी अमेरिका सज्ज होत आहे. इराणमधून इराणची कोणतीही व्यापारी नौका बाहेर पडू नये, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वस्तूंचे क्षेत्रही बंद केले जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

नवे व्यापार युद्ध शक्य

अमेरिकेने इराणवर अतिशय कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली असली, तरी त्यामुळे जगावर परिणाम होणार आहेत. तसेच जगात नवे व्यापार युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. इराणचे जास्तीत जास्त इंधन तेल चीनकडून विकत घेतले जाते. जर अमेरिकेने इराणचे तेल जागतिक बाजारात येणारच नाही, अशी व्यवस्था केली, तर चीनला मोठा फटका बसणे शक्य आहे.

सहकारी देशांनाही इशारा

इराणचे मित्र देश असणाऱ्या किंवा इराणशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या देशांनाही अमेरिकेने गंभीर इशारा दिला आहे. इराणसाठी मनी लाँडरिंग करणे, अवैध मार्गाने इराणचे तेल विकत घेणे किंवा अन्य देशांना विकणे, छुप्या मार्गाने इराणशी व्यापार किंवा आर्थिक संबंध ठेवणे असे प्रकार लक्षात आल्यास त्या देशांवरही कठोर कारवाई करण्याची अमेरिकेची योजना आहे. वरकरणी हे सर्व उपाय इराणला रोखण्यासाठी आहेत. तथापि, अमेरिकेचा मुख्य प्रतिस्पर्धी चीन आहे. चीन आणि इराणचे संबंध अतिशय जवळचे आहेत. इराणचे जवळपास 90 टक्के इंधन तेल एकटा चीन विकत घेतो. हे तेल अमेरिकेने खरोखरच बंद केले, तर केवळ इराणच नव्हे, तर चीनमध्येही तेलाची टंचाई निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त होते.

चीन युद्ध करेल काय...

तेल पुरवठा बंद झाला तर चीनचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे जगात साऱ्यांचे लक्ष आहे. इराणला चीन उघड साहाय्य देऊ शकेल काय ? इराणच्या संरक्षणासाठी चीन स्वत:हून युद्धात भाग घेईल काय ? असे अनेक प्रश्न सध्या जागतिक वर्तुळात चर्चिले जात आहेत. इराणची शस्त्रव्यवस्था चीनने पुरविलेली आहे. आतापर्यंत अमेरिका आणि इराणच्या युद्धात इराणने चीनी बनावटीची शस्त्रे उपयोगात आणली आहेत. त्यामुळे चीन स्वत: युद्धात उतरल्यास जागतिक शांतता ढवळून निघणार आहे. त्यामुळे पुढचे काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

Advertisement
Tags :

.