For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण युद्धाद्वारे अमेरिकेकडून चीन टार्गेट

06:22 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराण युद्धाद्वारे अमेरिकेकडून चीन टार्गेट
Advertisement

आतापर्यंतच्या घडामोडींमध्ये ट्रम्प यशस्वी

Advertisement

जे देश युद्ध लढत आहेत, त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होणे निश्चित आहे, परंतु काही असे देशत आहेत, जे इराण-इस्रायल युद्धावरून अस्वस्थ झाले आहेत. कारण हे युद्ध जितके दिवस चालेल, तितकेच या देशांचे नुकसान वाढत जाणार आहे. यामागे एक रणनीतिही काम करत आहे. ज्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन असून टार्गेटवर चीन आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे इराणवर दबावासोबत चीनला स्वत:ची शक्ती दाखवून देत आहेत. या खेळाच्या मध्यस्थानी कच्चे तेल आहे. यापूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल खजिन्यावर स्वत:चा कब्जा केला आहे.

Advertisement

इराणकडे जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे. हे प्रमाण 209 अब्ज बॅरल्सच्या आसपास आहे. याचबरोबर जगातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण 12-13 टक्के इतके आहे. सध्या अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंधांनंतरही इराण प्रतिदिन सुमारे 3.3 ते 3.5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करतो आणि यातील प्रतिदिन जवळपास 1.5 दशलक्ष बॅरल तेलाची निर्यात केली जाते.

अमेरिकेच्या अनेक निर्बंधांनंतरही चीन इराणच्या क्रूड ऑइलचा सर्वात मोठा खरेदीदार राहिला आहे. चीनकडून इराणच्या एकूण क्रूड ऑइल निर्यातीच्या जवळपास 80 टक्के आयात केली जाते. हे प्रमाण जवळपास 10 लाख बॅरल प्रतिदिनापेक्षा अधिक आहे. चीन इराणच्या तेलाला निर्बंधांदरम्यान विविध स्रोतांद्वारे खरेदी करतो, ज्यात छोटे रिफायफर, थर्ड-पार्टी ट्रेडर्स सामील आहेत.

अमेरिकेची रणनीति

अशास्थितीत इराणमध्ये अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्यास चीनसाठी संकट उभे ठाकू शकते. युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद झाल्याने चीनचे टेन्शन वाढले आहे, कारण जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा जवळपास 20 टक्के हिस्सा याच मार्गातून जात असतो. इराणपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण केले होते आणि हे थेट चीनवर वार करणारे पाऊल होते. अमेरिकेच्या ऊर्जा संस्थेनुसार व्हेनेझुएलाकडे सुमारे 303 अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. यामुळे हा कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक कच्च्या तेलाचा साठा असलेला देश आहे.

व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळविण्यासोबत ट्रम्प यांनी याला अमेरिकेकडून बाजारभावानुसार इतर खरेदीदारांना विकले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच जे देश डिस्काउंटवर कच्चे तेल खरेदी करत होते, त्यांच्यासमोर मोठे संकट आणि याच्या तडाख्यात सर्वाधिक चीन आला आहे. 2022-23 दरम्यान व्हेनेझुएलाकडून चीनने कच्चे तेल बाजारभावाच्या तुलनेत 20-25 टक्के कमी दराने खरेदी पेल होते.

चीन स्वत:च्या आवश्यकतेच्या सुमारे 70 टक्क्यांच्या आसपास कच्चे तेल  आयात करतो. यातील सुमारे 15 टक्के तर केवळ इराण-व्हेनेझुएलाकडून प्राप्त करतो. इराण आणि व्हेनेझुएलाच्या स्वस्त कच्च्या तेलाचा पर्याय बंद झाल्याने चीनला अन्य पर्यायांवरील निर्भरता वाढवावी लागेल आणि सौदी अरेबिया, इराक, रशिया, ब्राझीलकडून अतिरिक्त कच्चे तेल खरेदी करावे लागणार आहे.

1  तेल पुरवठ्यावर थेट परिणाम

चीन जगातील सर्वात मोठा कच्चे तेल आयातदार आहे, तो मोठ्या प्रमाणात पश्चिम आशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो, खासकरून इराणकडून. परंतु युद्ध चिघळल्यास आणि होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेलपुरवठा अडचणीत येऊ शकतो. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती महागतील, ज्याचा थेट परिणाम चीनची अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रावर पडणार आहे.

2 बीआरआय प्रकल्पाला धोका

चीनचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचे (बीआरआय) अनेक प्रकल्प पश्चिम आशियात आहेत. युद्धाच्या स्थितीत या प्रकल्पांची सुरक्षा आणि गुंतवणुकीवरील जोखिम वाढणार आहे.

3 चीन-इराण रणनीतिक भागीदारी

चीन आणि इराणदरम्यान 25 वर्षांचा रणनीतिक करार आहे. अमेरिका आणि इराण थेट युद्धात गुंतल्यास चीनवरील कूटनीतिक दबाव वाढणार असून त्याला संतुलन निर्माण करावे लागणार आहे, कारण इस्रायल आणि अमेरिकेसोबत त्याचे आर्थिक संबंध आहेत.

4 जागतिक व्यापार अन् निर्यातीवर परिणाम

चीनची अर्थव्यवस्था निर्यात आधारित आहे. युद्धामुळे जागतिक मंदी किंवा पुरवठासाखळी अडचणीत आल्यास चीनच्या निर्यातीला झटका बसणार आहे.

5 अमेरिकेच्या रणनीतिक प्राथमिकता

अमेरिका पश्चिम आशियात गुंतून पडल्यास चीनला हिंद-प्रशांत क्षेत्रात काही  रणनीतिक दिलासा मिळू शकतो. परंतु दुसरीकडे अस्थिरतेमुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता वाढेल, जी चीनसाठी नुकसानदायक असेल.

इराण-चीन व्यापाराचा आकार

2023 मध्ये दोन्ही देशांदरम्यान एकूण व्यापार जवळपास 14.6 अब्ज डॉलर्सचा राहिला. यात चीनकडून इराणला सामग्रीची निर्यात जवळपास 10.7 अब्ज डॉलर्सची होती, इराणकडून चीनला होणारी निर्यात 4.6 अब्ज डॉलर्सची राहिली. परंतु चीनच्या एकूण जागतिक व्यापाराच्या दृष्टीकोनातून इराणचा हिस्सा छोटा आहे. म्हणजेच चीनसाठी इराण व्यापारात मोठा हिस्सा राखत नाही. पण इराणसाठी चीन त्याचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. खासकरून ऊर्जा, यंत्रसामग्री आणि अन्य वस्तूंसाठी इराण पूर्णपणे चीनवर निर्भर आहे. आता युद्धाच्या स्थितीत इराणला नुकसान झाल्यास त्याचा प्रभाव चीनवर दिसून येणार आहे. याचमुळे चीन इराणमध्ये शांतता इच्छित आहे, तर अमेरिका कच्च्या तेलाव अंकुश मिळवत चीनला कमकुवत करू पाहत आहे. युद्ध लांबल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ शक्य आहे आणि याचा सर्वाधिक प्रभाव चीनवर पडणार आहे. चीनचे बजेट कोलमडू शकते आणि अमेरिकेला हेच हवे असावे.

Advertisement
Tags :

.