चिनी सॉफ्टवेअर अन् हार्डवेअरबद्दल अमेरिका साशंक
पेजर ब्लास्टची पार्श्वभूमी : आयातीवर बंदी घालण्याचा विचार सुरू
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
लेबनॉनमधील पेजर बॉम्ब स्फोट आणि वॉकी-टॉकी स्फोटाने तंत्रज्ञानाच्या धोकादायक वापरावरून जगभरात धास्ती निर्माण केली आहे. इस्रायलविरोधी लेबनॉनी समूह हिजबुल्लाहच्या सदस्यांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये 32 जण मारले गेले आणि हजारो जखमी झाले हेते. या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका सतर्क झाला आहे. अमेरिकन वाणिज्य विभाग सुरक्षा चिंतांमुळे देशात धावणाऱ्या वाहनांमध्ये चिनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
रस्त्यांवर लाखो वाहने धावत असताना आणि अचानकपणे त्यांचे सॉफ्टवेअर निष्क्रीय करण्यात आले तर किती खळबळ उडणार याची कल्पना कुणीही करू शकते असे वक्तव्य अमेरिकेचे वाणिज्य सचिव जीना रेमोंडो यांनी केले आहे.
अमेरिकेने चीनच्या विरोधात हे पाऊल उचलले तर चीनमधून ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टीम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरयुक्त वाहनांची आयात आणि विक्रीवर बंदी येणार आहे.
अमेरिकेतील रस्त्यांवर धावणाऱ्या जवळपास सर्व वाहनांना कनेक्टेड मानले जाते. कनेक्टेड वाहनांमध्ये ऑनबोर्ड नेटवर्क हार्डवेअर असते, ज्यामुळे इंटरनेटचा अॅक्सेस प्राप्त होतो. यामुळे वाहनात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी उपकरणासोबत डाटा शेअर करू शकतो.
अमेरिकेत वाहनांच्या परीक्षणावेळी चिनी ऑटो आणि तंत्रज्ञान कंपन्या संवेदनशील डाटा मिळविता आणि तो भविष्यासाठी राखून ठेवतात अशी चिंता अमेरिकेच्या खासदारांच्या एका समुहाने अलिकडेच व्यक्त केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी फेब्रुवारीमध्ये चीनकडून खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनांच्या सुरक्षा जोखिमीच्या तपासणीचे आदेश दिले होते.
चिनी स्पायवेअरवरून इशारा
गुप्त अधिकाऱ्यांना चिनी स्पायवेअरवरूनही चिंता होती. याचमुळे त्यांनी सरकारी आणि राजनयिक वाहनांची तपासणी करविली होती. तपासणीत कमीतकमी एक सिमकार्ड मिळाले जे लोकेशनचा डाटा पाठवू शकत होते. उपकरणाला एका चिनी पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आले होते असा दावा एका ब्रिटिश माध्यमाने स्वत:च्या अहवालात केला होता.
लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटापूर्वी देखील इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे हेरगिरीचे काम करता येते असे मानले जात होते. परंतु स्फोटानंतर एका नव्या प्रकारच्या युद्धाचा धोका वाढला आहे. आता दूर राहूनच इलेक्ट्रॉनिक उपकरणात स्फोट घडवून मोठा विध्वंस करता येणार आहे. कनेक्टेड कार्सना निष्क्रीय करणे आणि रस्त्यांवर मोठी हानी घडविण्याचा प्रकार यात सामील आहे.
पुरवठासाखळी विषयक धोका
लेबनॉनमध्ये पेजर विस्फोटासाठी हिजबुल्लाहने इस्रायलला दोषी ठरविले आहे. या हल्ल्याने पुरवठा साखळी युद्धाचा नवा धोका निर्माण केला आहे. इस्रायलने तैवानची एक कंपनी गोल्ड अपोलोकडून निर्मित पेजरमध्ये स्फोटके पेरल्याचे मानले जाते. पेजरवर गोल्ड अपोलोचा लोगो अन् स्टिकर होता. परंतु गोल्ड अपोलोने हे पेजर बुडापेस्ट येथील बीएसी कंसल्टिंगने निर्माण केल्याचा दावा केला आहे. कंसल्टिंग कंपनीकडे गोल्ड अपोलोडच्या लोगोचा वापर करण्याचा मालकी अधिकार होता. कंपनी एक व्यापारी मध्यस्थ असून ती देशात काहीच निर्माण करत नसल्याचे हंगेरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जगातिक पुरवठा साखळी अनेक देशांमध्ये फैलावलेले कंत्राटदार, उपकंत्राटदार आणि सुट्या भागांच्या पुरवठादारांच्या दीर्घ साखळीतून जाते. या पुरवठा साखळीत चीनची भूमिका अत्यंत मोठी आहे, कारण जगाला सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्सचा पुरवठा चीनकडूनच होतो.
चीनच्या चिंतेतही भर
पेजर ब्लास्टनंतर अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवरून सतर्क झाला आहे. तर चीन देखील अमेरिका आणि त्याचे सहकारी ज्यात तैवान सामील आहे, त्यांच्याकडून निर्मित इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन प्रॉडक्ट्सकडे अधिक संशयाच्या नजरेने पाहणार आहे. तैवान हा अमेरिकेचा घनिष्ठ भागीदार आहे, यामुळे इस्रायलच्या गुप्त मोहिमेत त्याचाही समावेश होता असे चीनचे मानणे आहे. याचमुळे चीन आता तैवानच्या उद्योगांवर अधिक सतर्क नजर ठेवू शकतो.