For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रंप यांना अमेरिकन सिनेटचा इशारा

01:07 AM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रंप यांना अमेरिकन सिनेटचा इशारा
Advertisement

अनुमतीशिवाय युद्ध न करण्याचे विधेयक संमत

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणविरोधातील युद्ध लोकप्रतिनिधीगृहाची अनुमती मिळाल्याशिवाय पुढे चालू ठेवू नये, अशी अट घालणारा प्रस्ताव अमेरिकेच्या सिनेटने (वरीष्ठ सभागृह) संमत केला आहे. या युद्धाचा प्रारंभ झाल्यापासून असे विधेयक संमत करण्याचा प्रयत्न सिनेटने सातवेळा केला आहे. तथापि, या आठव्या प्रयत्नात सभागृहाला ते संमत करण्यात यश आले आहे.

Advertisement

सिनेटच्या 100 सदस्यांपैकी 50 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने, तर 47 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. सिनेटमध्ये ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. तरीही, हे विधेयक संमत झाले आहे. या विधेयकाच्या समर्थनात रिपब्लिकन पक्षाच्या 4 सदस्यांनी, तर डेमॉव्रेटिक पक्षाच्या एक वगळता सर्व सदस्यांनी मतदान केल्याने ते संमत होऊ शकले आहे. हे विधेयक ‘अॅडव्हान्स’ स्वरुपात, म्हणजेच तातडीने संमत करण्यात आलेले आहे.

बिल कॅसीडी यांचे प्रतिपादन

इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक आहे. तो मोडून काढला पाहिजे, हे ट्रंप प्रशासनाचे धोरण योग्यच असून मी या धोरणाचा समर्थक आहे. तथापि, ट्रंप यांनी या युद्धाचा प्रारंभ करताना आणि ते पुढे चालू ठेवताना अमेरिकन सिनेट किंवा काँग्रेस यांची अनुमती घेतली नव्हती. ही बाब अयोग्य होती. त्यामुळे या विधेयकाचे आम्ही समर्थन करीत आहोत. हे युद्ध पुढे चालवायचे असेल, तर ट्रंप यांनी या युद्धासाठी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहांची संमती घेण्याची आवश्यकता आहे. अशी संमती घेतल्याशिवाय त्यांना युद्ध पुढे चालविता येणार नाही. तसे करण्याची त्यांची क्षमता या विधेयकाने काढून घेतली जात आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर बिल कॅसीडी यांनी बुधवारी पत्रकारांसामोर केले आहे.

ट्रंप यांना नकाराधिकार

हे विधेयक केवळ या प्रक्रियेतील प्रथम टप्पा आहे. हे विधेयक दोन्ही समागृहांमध्ये संमत होण्याची आवश्यकता आहे. इतके होऊनही ट्रंप यांच्या निर्णयावर या विधेयकाचा परिणाम होण्याची शक्यता दुरापास्त आहे. कारण, अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहांच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केले, तरी ट्रंप त्यांचा अध्यक्षीय नकाराधिकार उपयोगात आणून हे विधेयक निष्प्रभ करु शकतात. त्यामुळे, एक प्रकारे हे विधेयक केवळ एक उपचार असल्याचे दिसते.

Advertisement

.