For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणविरुद्ध लष्करी कारवाईला अमेरिकन सिनेटचा विरोध

06:22 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणविरुद्ध लष्करी कारवाईला अमेरिकन सिनेटचा विरोध
Advertisement

ट्रम्प यांना मोठा धक्का : ‘वॉर पॉवर्स’ ठराव पहिल्यांदाच मंजूर

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या सिनेटने ‘वॉर पॉवर्स’ ठराव पहिल्यांदाच मंजूर करून इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर मर्यादा घालण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. हा ठराव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या माध्यमातून अमेरिकन सिनेटने इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला आहे. मंगळवारच्या मतदानात हा ठराव 50:48 मतांनी मंजूर झाला. जरी हा ठराव कायदेशीररित्या बंधनकारक नसला आणि त्याचा पूर्ण कायदेशीर परिणाम होणार नसला तरी, ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी कारवाईला काँग्रेसने केलेला हा एक महत्त्वाचा आणि प्रतिकात्मक विरोध मानला जात आहे.

Advertisement

सिनेटने ‘वॉर पॉवर्स’ ठराव मंजूर करणे महत्त्वपूर्ण आहे, कारण यापूर्वी असेच नऊ प्रयत्न अयशस्वी झाले होते. या ठरावाच्या माध्यमातून सिनेटमधील ट्रम्प यांचा घटत चाललेला पाठिंबा देखील स्पष्ट झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकन प्रतिनिधीगृहाने देखील हा ठराव मंजूर केला होता. ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना याला अयोग्य वेळी आणलेला व निरुपयोगी ठराव असे संबोधले. या मतदानामुळे इराणला मदत होईल आणि त्याचे मनोधैर्य वाढेल, असा आरोपही त्यांनी केला.

डेमोक्रॅटिक सिनेटरच्या मते इराणविरोधात छेडलेले युद्ध हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट धोरण आहे. इराणमधील ट्रम्प यांच्या ऐतिहासिक चुकीची किंमत अमेरिकन जनता मोजत आहे, जी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात वाईट चुकांपैकी एक म्हणून इतिहासात नोंदवली जाईल, असे सिनेटमधील डेमोक्रॅटिक नेते चक शुमर यांनी म्हटले आहे. अनेक रिपब्लिकन कायदेकर्ते स्वत: कराराशीच असहमत आहेत. इराणच्या पुनर्बांधणीसाठी प्रस्तावित 300 अब्ज डॉलर्सच्या निधीवर विशेषत: आक्षेप घेतला जात आहे. ही रक्कम 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणला दिलेल्या 1.7 अब्ज डॉलर्सपेक्षा खूप जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यापासून डेमोक्रॅटिक कायदेकर्ते सातत्याने युद्धशक्ती ठराव मांडत आहेत, परंतु त्यांना अद्याप आवश्यक पाठिंबा मिळवण्यात अपयश आले आहे.

चार रिपब्लिकन सिनेटर्सचाही पाठिंबा

मतदानादरम्यान लिसा मुरकोव्स्की, सुसान कॉलिन्स, रँड पॉल आणि बिल कॅसिडी या चार रिपब्लिकन सिनेटर्सनी डेमोक्रॅट्ससोबत ठरावाच्या बाजूने मतदान केले. डेमोक्रॅटिक सिनेटर जॉन फेटरमन यांनी ठरावाला विरोध केला. ट्रम्प यांनी या चार रिपब्लिकन सिनेटरवर टीका करत म्हटले की, त्यांनी त्यांचे काम अधिक कठीण केले आहे. दोन रिपब्लिकन सिनेटरच्या अनुपस्थितीचाही मतदानाच्या निकालावर परिणाम झाला. यामध्ये केंटकीचे सिनेटर मिच मॅककॉनेल यांचा समावेश होता. त्यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

इराण युद्धानंतर शस्त्रs आणि लष्करी साठा पुन्हा भरण्यासाठी अमेरिकेचा संरक्षण विभाग काँग्रेसकडून सुमारे 80 अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची मागणी करत असतानाच हे मतदान पार पडले. आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कॅपिटल हिलवर रिपब्लिकन सिनेटर्सना भेटणार आहेत. गेल्या आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानुसार दोन्ही बाजूंना इराणच्या अणुकार्यक्रमावर सर्वसमावेशक करार करण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.