For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलावर अमेरिकेचा कब्जा

06:58 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलावर अमेरिकेचा कब्जा
Advertisement

इतिहासातील सर्वात मोठा करार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांकडूनही दुजोरा

Advertisement

वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन, कराकस

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त तेलसाठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक करार केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हेनेझुएलासोबतच्या कराराची घोषणा केली. या करारामुळे अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळेल. सदर करार अंमलात आल्यानंतर अमेरिकेला व्हेनेझुएलामध्ये असलेल्या प्रचंड तेलसाठ्यांवर ताबा मिळेल. विशेष बाब म्हणजे अमेरिकेला हे तेल खरेदी किमतीत मिळेल.

Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कराराची घोषणा करताना ‘अमेरिकेने व्हेनेझुएला देशासोबत जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार केला आहे.’ अशी घोषणा केली. या करारासाठी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात चर्चा झाल्याचे अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितले. हा आकडा महत्त्वपूर्ण आहे, कारण स्वत: अमेरिकेकडे अंदाजे 46 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. तसेच भारताच्या तुलनेत, भारत दरवर्षी अंदाजे 1.6 ते 1.7 अब्ज बॅरल कच्चे तेल खरेदी करतो. अर्थातच हे 65 अब्ज बॅरल तेलसाठा हे प्रमाण भारताच्या 40 वर्षांच्या तेल आयातीइतके असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते, हा प्रकल्प व्हेनेझुएलामध्ये कार्यरत असलेल्या एका खासगी कंपनीच्या सहकार्याने राबवला जाईल. या भागीदारीतून उत्पादित होणाऱ्या तेलामध्ये अमेरिकेला 55 टक्के वाटा मिळेल. तथापि, या खासगी कंपनीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये याला जगातील सर्वात मोठा करार म्हटले आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनीही याला एक ऐतिहासिक करार म्हटले आहे.

व्हेनेझुएलाकडे 300 अब्ज बॅरल तेलसाठा

व्हेनेझुएलाकडे 300 अब्ज बॅरलपेक्षा जास्त तेलसाठा असून, तो जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. ट्रम्प ज्या 65 अब्ज बॅरल तेलावर अमेरिकेचे नियंत्रण येण्याबद्दल बोलत आहेत, ते व्हेनेझुएलाच्या एकूण तेलसाठ्याच्या सुमारे एक-पंचमांश आहे. व्हेनेझुएलाकडे प्रचंड साठा असूनही उत्पादन खूपच कमी आहे. आर्थिक संकट गुंतवणुकीचा अभाव आणि अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेथील तेल उद्योग बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे.

अमेरिकेला किती तेल मिळेल?

या कराराचा सर्वात महत्त्वाचा पैलू अजूनही अस्पष्ट आहे. अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरल तेलाची मालकी मिळेल की केवळ उत्पादनातील मोठा वाटा मिळेल, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याच्या माहितीनुसार, या भागीदारीतून उत्पादित होणाऱ्या तेलापैकी 55 टक्के तेल अमेरिकेला मिळेल. तथापि, यात सामील असलेल्या खासगी कंपनीचे नाव आणि कराराच्या संपूर्ण अटी अद्याप उघड झालेल्या नसल्यामुळे 65 अब्ज बॅरल तेलावर अमेरिकेचे नियंत्रण असण्याचा अर्थ असा नाही की सर्व तेल अमेरिकेचे आहे. कराराच्या संपूर्ण अटी उघड झाल्यावरच अमेरिकेला मिळणाऱ्या हक्कांचे नेमके प्रमाण स्पष्ट होईल.

100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या म्हणण्यानुसार, या करारानुसार व्हेनेझुएलातील 17 तेलक्षेत्रांचा पुनर्विकास केला जाईल. ही गुंतवणूक 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे भविष्यात व्हेनेझुएला सरकारला अंदाजे 209 अब्ज डॉलर्सचा कर मिळू शकेल, असे सांगण्यात आले. व्हेनेझुएलाला देशाच्या विकासासाठी आपल्या प्रचंड तेलसाठ्यांचा वापर करायचा आहे.

Advertisement
Tags :

.