कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिका-सौदी अरेबियात शस्त्रकरार

06:48 AM May 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिका विकणार 12 लाख कोटी रुपयांची शस्त्रे

Advertisement

वृत्तसंस्था / रियाध

Advertisement

अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात मोठा शस्त्रविक्री करार झाला आहे. या करारानुसार अमेरिका सौदी अरेबियाला एकंदर 12 लाख 60 हजार कोटी रुपयांची शस्त्रे (142 अब्ज डॉलर्स) विकणार आहे. या शस्त्रांमध्ये युद्धविमाने, क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक अत्याधुनिक शस्त्रप्रणालींचा समावेश आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी सौदी अरेबियाचे नेते राजपुत्र सलमान यांची भेट घेतली. सौदी अरेबिया अमेरिकेत 50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा शस्त्रकरार महत्वाचा मानला पाहिजे असे तज्ञांचे मत आहे.

सौदी अरेबिया प्रमुख शस्त्रखरेदीदार

सौदी अरेबिया हा अमेरिकेचा प्रमुख शस्त्रग्राहक आहे. आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे या देशाने अमेरिकेकडून खरेदी केलेली आहेत. तथापि, एकाचवेळी झालेला हा या दोन देशांमधील सर्वात मोठा शस्त्रकरार आहे, असे बोलले जात आहे. अमेरिकेतील मागच्या जोसेफ बायडेन यांच्या प्रशासनाने सौदी अरेबियाशी असा मोठा शस्त्रकरार करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी झाला होता.

12 कंपन्यांचा समावेश असणार

अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यातील या शस्त्रकारारात अमेरिकेतील 12 शस्त्रनिर्मिती कंपन्या समाविष्ट असतील. सौदी अरेबिया या कंपन्यांकडून विविध प्रकारची शस्त्रे आणि प्रशिक्षण घेणार आहे. या कराराची पूर्तता झाल्यानंतर सौदी अरेबियाची सामरिक शक्ती वाढणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

एफ-35 संबंधी अनिश्चितता

अमेरिकेचे सर्वात आधुनिक मानले गेलेले एफ 35 हे युद्धविमान या कराराचा एक भाग आहे की नाही, यासंबंधी अनिश्चितता आहे. या कराराची जी माहिती आतापर्यंत उघड झालेली आहे, तिच्यानुसार या विमानांचा उल्लेख या करारात नसल्याचे समजते. तसेच अमेरिकेची जी अत्याधुनिक शस्त्रे इस्रायलला देण्यात आाr आहेत, ती किंवा तशी शस्त्रे अमेरिका सौदी अरेबियाला देणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे उत्तर या कराराचे नेमके स्वरुप स्पष्ट झाल्यानंतरच मिळणार आहे. इस्रायलने अमेरिकेकडून अनेक एफ 35 विमाने घेतली असून इस्रायलकडे या विमानांच्या अनेक स्वाड्रन्स सध्या कार्यरत आहेत.

इस्रायलची चिंता

अमेरिकेने सौदी अरेबियाला इस्रायलला पुरविली आहेत तशी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दिल्यास कधीना कधी त्यांचा उपयोग इस्रायलच्या विरोधात होऊ शकेल, अशी इस्रायलला चिंता आहे. सध्या इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात सौहार्दाचे संबंध आहेत. पण मधपूर्वेतील राजकारणाची रीत पाहता हे सौदार्ह स्थायी आहे का याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही दशकांपूर्वी इस्रायल आणि इराण यांचीही घनिष्ट मैत्री होती. पण इराणमध्ये कट्टर धर्मवाद्यांचे प्रशासन आल्यानंतर इराण आणि इस्रायल यांच्या शत्रुत्व निर्माण झाले. तसे सौदी अरेबिया संबंधात होणार नाही, याची शाश्वती देता येत नाही, असे तज्ञांचे मत आहे.

सौदी अरेबिया प्रथम देश ?

इस्रायलला अमेरिका जी आधुनिक शस्त्रे पुरवित आहे, तशी अमेरिकेने सौदी अरेबियाला पुरविल्यास इस्रायलनंतर सौदी अरेबिया अशी शस्त्रे विकत घेणारा मध्यपूर्वेतील प्रथम देश ठरणार आहे. कारण आतापर्यंत अमेरिकेने कुवेत, कतार इत्यादी आपल्या अरब मित्र देशांना अशी शस्त्रे पुरविलेली नाहीत. त्यामुळे अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात नेमक्या कोणत्या शस्त्रांचा व्यवहार होणार आहे, यासंबंधी साऱ्या जगात उत्सुकता आहे. येत्या काही दिवसांमध्ये या कराराचे स्वरुप अधिक स्पष्ट झाल्यानंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहेत

Advertisement
Next Article