पाक अधिकाऱ्याला अमेरिकेचा नकार
देशात प्रवेश देण्यापासून वंचित, व्हिसास नकार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
पाकिस्तानच्या तुर्कमेनिस्तान येथील राजदूताला अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. या अधिकाऱ्याचे नाव के. के. अहसान वागन असे आहे. त्याला अमेरिकेचा व्हिसा दिला गेला नाही. त्यामुळे त्याला अमेरिकेत प्रवेश करता आला नाही, अशी माहिती द न्यूज या वृत्तपत्राने सोमवारी प्रसारित केली आहे.
वागन हे काही कारणासाठी अमेरिकेत जाणार होते. तथापि, त्यांना अमेरिकेच्या व्हिसा अधिकाऱ्याने व्हिसा देण्यास नकार दिला. परिणामी, त्यांना अमेरिकेत प्रवेश करता आला नाही. ते अमेरिकेतील लॉस एंजल्स वास्तव्य करणार होते. तथापि, त्यांच्याकडे अमेरिकेचा अधिकृत व्हिसा नसल्याने त्यांना लॉस एंजल्स विमानतळावरुनच हाकलून देण्यात आले. असेही वृत्त काही संस्थानी दिले आहे.
कागदपत्रांच्या वैधतेवर आक्षेप
यासंदर्भात पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार वागन यांच्याकडे अमेरिकेत प्रवेश करण्यासंबंधीची वैध कागदपत्रे नव्हती. त्यांना स्थलांतरिताची कागदपत्रे देण्यास अमेरिकेने नकार दिला होता. त्यामुळे ते अमेरिकेच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्वरित त्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यांचे प्रत्यागमन (डीपोर्टेशन) करण्यात आले, असे पाकिस्तानच्या अधिकृत माहितीनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी घटना दुर्मिळ
एखाद्या देशाच्या अन्य देशातील राजदूताला अशा प्रकारे तिसऱ्या देशाने व्हिसा आणि प्रवेश नाकारणे ही घटना दुर्मिळ मानली जाते. सर्वसाधारणत: कोणत्याही देशाच्या राजदूताचा सन्मान ठेवला जातो. तथापि, वागन यांच्या संदर्भात असे घडलेले नाही. त्यांच्या प्रवास कागदपत्रांमध्ये काही आक्षेपार्ह नोंदी होत्या. त्यामुळे त्यांना अमेरिकेत घेण्यात आले नाही, असे सांगण्यात येत असले तरी, या घटनेमुळे पाकिस्तानचे प्रशासन सावध झाले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानात हालचाली
वागन यांची अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दर आणि पराष्ट्र विभागाच्या सचिव अमीना बलोच यांना देण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने आपल्या लॉस एंजल्स येथील व्यापारी दूतावासाला या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला. आता वागन यांना तुर्कमेनिस्तानहून माघारी बोलाविण्यात येईल आणि त्यांच्या झाल्या प्रकारचे स्पष्टीकरण मागण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
पाकिस्तानी नागरीकांवर निर्बंध ?
अमेरिका लवकरच पाकिस्तानी नागरीकांच्या अमेरिका प्रवेशावर निर्बंध घालणार आहे, असे वृत्त एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने नुकतेच दिले आहे. या वृत्ताचा संबंध या घटनेशी जोडला जात आहे. अमेरिकेच्या ट्रंप प्रशासनाने असा निर्णय घोषित केल्यास तो पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.