अमेरिकेच्या अध्यक्षांकडून भारतीय कर्मचाऱ्यांचे कौतुक
अमेरिकेत ब्रिजला धडकले होते जहाज : भारतीयांमुळे वाचला अनेकांचा जीव
वृत्तसंस्था/ बाल्टीमोर
अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये जहाज धडकल्याने बाल्टीमोरचे फ्रान्सिस स्कॉट ब्रिज सोमवारी रात्री उशिरा कोसळला होता. यानंतर अनेक तासांपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेनंतर बेपत्ता 6 जणांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाचे अधिकारी अॅडमिरल शॅनन गिलरीथ यांनी दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी जहाजावरील चालक दलाचे सदस्य असलेल्या 22 भारतीयांचे कौतुक केले आहे. या भारतीयांनी प्रसंगावधानता दाखवून संबंधित प्रशासनाला वेळीच कळविल्याने अनेकांचा जीव वाचू शकला आहे.
आम्ही अनेक तासांपर्यंत पेटाप्सको नदीत शोधमोहीम राबविली. पाण्याचे तापमान आणि अन्य घटक पाहता नदीत कोसळलेले 6 जण वाचणे शक्य नसल्याचे आमचे मानणे आहे. याचमुळे आम्ही ही बचावमोहीम थांबवत आहोत. परंतु तटरक्षक दल आणि अन्य अधिकारी अद्याप येथेच राहणार असल्याचे अॅडमिरल गिलरीथ यांच्याकडून सांगण्यात आले.
तर संबंधित जहाजाच्या चालक दलाच्या सदस्यांमध्ये 22 भारतीय होते, जे सुखरुप आहेत. मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी जहाजावरील कर्मचाऱ्यांनी योग्यवेळी धोक्याची माहिती दिल्याने ब्रिजवरील वाहतूक रोखण्यात आली आणि यामुळे अनेकांचा जीव वाचला असल्याचे सांगितले आहे.
जहाजावरील ऊर्जापुरवठा ठप्प
सिंगापूरचा ध्वज असलेल्या या जहाजावरील ऊर्जापुरवठा ठप्प झाला होता. यामुळे जहाजावरील नियंत्रण चालक दलाने गमाविले होते. यानंतर हे जहाज ब्रिजला धडकले होते. यादरम्यान ब्रिजवर असलेले 8 बांधकाम कामगार हे पाण्यात कोसळले होते. यातील 2 जणांना वाचविण्यात आले आहे. तर 6 जण बेपत्ता आहेत. जहाज धडकण्यापूर्वी हा ब्रिज योग्य स्थितीत होता. बिज कोसळण्याची घटना मेरीलँडच्या लोकांना चकित करणारी होती. या ब्रिजचा वापर लोक मागील 47 वर्षांपासून करत होते असे गव्हर्नर मूर यांनी सांगितले आहे.
दुर्घटनेचा तपास सुरू
या दुर्घटनेचा तपास सध्या सुरू आहे. ब्रिज बंद करण्यात आल्याने त्यावरून कुठलेही वाहन जात नव्हते असे प्रारंभिक तपासात आढळून आले आहे. तर गव्हर्नर मूर यांनी दुर्घटनेमागे दहशतवाद्यांचा हात नसल्याचा दावा केला आहे. दहशतवादी हल्ल्याचा कुठलाही विश्वासार्ह पुरावा मिळालेला नाही असे मूर यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांनी प्रशासनाला बचाव प्रयत्नांमध्ये मदत करण्याचा निर्देश दिला आहे.
भारतात कोळसा संकट?
अमेरिकेच्या बाल्टीमोरमध्ये फ्रान्सिस स्कॉट ब्रिज कोसळल्याने भारतीय कोळसा आणि पेटकोक बाजारात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमुळे पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होण्याची आणि दर वाढण्याची चिंता सतावू लागली आहे. बाल्टीमोर हार्बर हे कोळसा निर्यातीसाठी महत्त्वाचे जागतिक केंद्र आहे. परंतु येथे दुर्घटना झाल्याने पुरवठासाखळीसमोर अडथळे निर्माण झाले आहेत. भारत हा चीननंतरचा सर्वात मोठा कोळसा आयातदार देश आहे. ही दुर्घटना आर्क कोळशाची वाहतूक रोखणार असून यामुळे भारतासाठी पुरवठा साखळीत अनेक समस्या निर्माण होतील असे तज्ञांनी म्हटले आहे.