"शांततेसाठी या अन्यथा विनाशाला सामोरे जा" ट्रम्प यांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक अन् जगाला धास्ती
गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या अमेरिका - इस्रायलच्या संयुक्त आघाडीविरोधातील इराणच्या युद्धाने जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने इराणला इशारा दिला आहे. आतापर्यंत घडलेल्या घडामोडींनुसार अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा वारंवार अयशस्वी होत असून, दोन्ही बाजूंचा संघर्ष सुरूच आहे.
दरम्यान, 'रॉ'चे माजी एजंट लकी बिष्ट यांनी एक नवीन दावा केला आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या, १९ मे रोजी एक मोठी बैठक घेत आहेत, ज्यामध्ये एमआय६ (यूके) आणि डीजीएसई (फ्रान्स) यांसारख्या परदेशी गुप्तचर संस्था देखील सहभागी होऊ शकतात. जर लकी बिष्ट यांचा दावा खरा असेल, तर अमेरिका निश्चितपणे इराणविरुद्ध मोठी कारवाई करू शकते.
लकी बिष्ट यांनी काय सांगितलं?
माजी रॉ एजंट लकी बिष्ट यांनी त्यांच्या एक्स हँडलवर दावा केला आहे की, "उद्या (१९ मे), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये त्यांचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या उच्चस्तरीय बैठकीत इराणविरुद्धचे लष्करी पर्याय आणि भविष्यातील युद्धनीतीवर चर्चा केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, एमआय६ (यूके) आणि डीजीएसई (फ्रान्स) यांसारख्या परदेशी गुप्तचर संस्थांचे अधिकारीदेखील या गुप्तचर बैठकीत सहभागी होऊ शकतात."
ट्रम्प यांचा इराणला इशारा.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. वेळ निघून जात असून, त्यांनी लवकरात लवकर करार केला पाहिजे, अन्यथा त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल, असे ते म्हणाले आहेत. अमेरिकेने झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई दिल्यानंतरच वाटाघाटी होतील, असेही इराणने स्पष्ट केले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
इराणने अमेरिकेच्या ह्या अटी स्वीकारण्यास नकार दिला.
इराणने आपले ४०० किलोग्रॅम संवर्धित युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करावे. फक्त एकच अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत ठेवा; युद्धामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी सोडून द्या. अमेरिकेने इराणला जप्त केलेली मालमत्ता गोठवून ठेवण्यास सांगितले आहे. इराणने अमेरिकेच्या या अटी पूर्णपणे फेटाळल्या आहेत. इराणने आपल्या लष्कराला 'उच्चतम सतर्कते'वर ठेवले असून, माघार घेणार नाही असे म्हटले आहे.