अमेरिकेच्या नौदलाचा स्वत:च्या विमानावर क्षेपणास्त्र हल्ला
येमेनवरील हवाईहल्ल्यादरम्यान दुर्घटना : दोन्ही वैमानिक सुरक्षित
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या नौदलाने रविवारी लाल समुद्रात स्वत:च्याच एका लढाऊ विमानावर क्षेपणास्त्र डागले आहे. ही घटना येमेनमधील हुती बंडखोरांवरील एअरस्ट्राइकदरम्यान घडली आहे. विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असून यातील एक वैमानिक किरकोळ जखमी झाला आहे.
ही घटना चुकून घडली असून दुर्घटनेत एफ/ए-18 विमान कोसळले आहे. या विमानाने युएसएस हॅरी एस. ट्रूमन विमानवाहू युद्धनौकेवरून उ•ाण केले होते. उ•ाण केल्यावर युएसएस गेटिसबर्ग क्षेपणास्त्र क्रूजरने चुकून या विमानावर क्षेपणास्त्र डागल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आले. युएसएस गेडिसबर्ग अमेरिकेचे एक गायडेड मिसाइल क्रूजर असून जे शत्रूंची विमाने आणि क्षेपणास्त्रांना आकाशातच नष्ट करते.
अमेरिकेच्या सैन्याने येमेनची राजधानी सना येथे हवाई हल्ले करत बंडखोरांच्या तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये हूती बंडखोरांचे क्षेपणास्त्र भांडार आणि कमांड सेंटरला नष्ट करण्यात आले आहे. दक्षिण लाल समुद्र, बाब अल-मन्देब आणि एडनच्या आखातात अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौका आणि कार्गो शिपवरील हुती बंडखोरांचे हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. अमेरिकेने यावेळी हुती बंडखोरांचे अनेक ड्रोन्स आणि क्रूझ क्षेपणास्त्राला नष्ट केले आहे.
अमेरिका आणि ब्रिटनने मागील काही महिन्यांमध्ये येमेनमधील हुती बंडखोरांच्या तळांवरील हल्ले वाढविले आहेत. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ट्रुमॅन 15 डिसेंबर रोजी मध्यपूर्वेत पोहोचली होती. लाल समुद्रात ही विमानवाहू युद्धनौका कुठे तैनात करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
हुती बंडखोरांवरील कारवाईचे निर्देश अध्यक्ष जो बिडेन यांनी दिले आहेत. अमेरिकेला या हल्ल्यांसाठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा हुती बंडखोराचे नेते नसरुद्दीन आमेर यांनी दिला आहे.