For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत नौदल प्रमुखाची हकालपट्टी

07:00 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत नौदल प्रमुखाची हकालपट्टी
Advertisement

इराण युद्धादरम्यान आण्विक विभागाचा वरिष्ठ अधिकारीही निलंबित : हनीट्रॅपमुळे कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात (पेंटागॉन) सातत्याने मोठे निर्णय घेतले जात आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी सैन्यप्रमुख रँडी जॉर्ज यांना पदावरून हटविले होते आणि आता नौदल प्रमुख जॉन फेलन यांना बडतर्फ करण्यात आले आहे. याचबरोबर आण्विक विभागाशी निगडित एक वरिष्ठ अधिकारी एंड्य्रू हग यांना संवेदनशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे, हग यांना कथित स्वरुपात हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते. अमेरिका इराणसोबतच्या युद्धात गुंतलेला असताना हा सर्व प्रकार घडत आहे. पेंटागॉनकडून नौदल प्रमुखांना हटविण्यासंबधी वक्तव्य जारी करत माहिती देण्यात आली, परंतु त्यामागील कारण देण्यात आले नाही. पण, सूत्रांनुसार मागील काही महिन्यांपासून फेलन आणि पेंटागॉनच्या वरिष्ठ नेतृत्वादरम्यान सातत्याने मतभेद सुरू होते. खासकरून नौदलाचा नौका निर्मिती कार्यक्रम, काम करण्याची पद्धत आणि नेतृत्वावरून फेलन अन् संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यातील सुप्त संघर्ष वाढत होता.

Advertisement

अनेक प्रकल्पांना विलंब

अमेरिका स्वत:च्या नौदलाला मजबूत करण्यासाठी नव्या युद्धनौका, पाणबुडी आणि सहाय्य नौका वेगाने निर्माण करू इच्छितो. यासाठी मोठ्या स्तरावर शिपबिल्डिंग सुधार सुरू करण्यात आले होते. यात नव्या नौकांच्या डिझाइनला वेग देणे, निर्मिती प्रक्रियेला आधुनिक करणे आणि खासगी शिपयार्डसोबत ताळमेळ वाढविण्याची उपाययोजना सामील आहे. या योजनांमध्ये अनेक अडचणी येत होत्या. नौका निर्माण करण्यास मोठा विलंब झाला आहे, अनेक प्रकल्प निर्धारित काळापेक्षा मागे पडले आहेत. खर्चही सातत्याने वाढत होता, अशास्थितीत फेलन हे आवश्यक सैन्य सुधारणा लागू करण्यास अपयशी ठरल्याचे हेगसेथ यांचे मानणे होते.

ट्रम्प यांच्याशी थेट संपर्क

फेलन यांनी थेट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संपर्क करणेही वादाचे कारण ठरले. फेलन हे थेट अध्यक्षांशी संपर्क साधत होते, तर सर्वसाधारणपणे असे केले जात नाही. अमेरिकेच्या सैन्यात एक निश्चित कमांड चेन असते, म्हणजेच निर्णय आणि माहिती खालून वर एका निश्चित क्रमात जाते. नौदलाचे अधिकारी प्रथम स्वत:च्या वरिष्ठाला कळवितात, मग संरक्षण मंत्रालयाद्वारे ती अध्यक्षांपर्यंत पोहोचते. परंतु फेलन यांनी या निश्चित व्यवस्थेला दुर्लक्षित करत थेट अध्यक्षांशी संपर्क साधला होता. यामुळे हेगसेथ तीव्र नाराज झाले होते.

एंड्य्रू हग यांचा व्हिडिओ व्हायरल

आण्विक विभागाचे अधिकारी एंड्य्रू हग यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत ते एका रेस्टॉरटमध्ये एका महिलेला संवेदनशील माहिती देताना दिसून आले. यात अमेरिकेच्या आण्विक आणि रासायनिक सुरक्षेशी निगडित मुद्द्यांचा उल्लेख आहे.   अमेरिकेकडे अद्याप नर्व एजंट असून एका अमेरिकन  आर्मी केमिस्टचा मृत्यू त्याच्या संपर्कात आल्यामुळे झाल्याचा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे. हेग हे अमेरिकेचे ‘चीफ ऑफ केमिकल न्यूक्लियर श्योरिटी’ होते आणि आण्विक आणि रासायनिक सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. व्हिडिओ समोर येताच त्यांना सक्तीच्या प्रशासकीय सुटीवर पाठविण्यात आले आहे.

कार्यकाळ संपण्यापूर्वी पदावरून हटविले

अमेरिकेच्या सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ जनरल रँडी जॉर्ज यांना 2 एप्रिल रोजी पदावरून हटविण्यात आले होते. जॉर्ज यांचा कार्यकाळ 2027 मध्ये समाप्त होणार होता. रँडी जॉर्ज यांना जो बिडेन प्रशासनाच्या काळात नियुक्त करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.