शुल्क आकारणीनंतर अमेरिकेतील बाजारात दबाव
टेक्सास : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर शुल्क आकारणीची टक्केवारी जाहीर केली असून याचा सर्वाधिक फटका खुद्द त्यांच्या शेअरबाजारावर गुरुवारी पाहायला मिळाला. डोव्ह जोन्स 1000 अंकांहून अधिक घसरलेला दिसला. 10 टक्केपासून सुरुवातीचे शुल्क ठेवत त्यापुढे शुल्क आकारणी अमेरिकेने घोषित केली. भारतावर अमेरिकेने 26 टक्के इतकी शुल्क आकारणी करण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या घोषणेनंतर जागतिक पटलावर व्यापार युद्धाच्या शंकेला वाट मोकळी झाली आहे. डो जोन्स निर्देशांक 1 हजार अंकांनी घसरला तर एस अँड पी-500 3.5 टक्के घसरणीत दिसून आला. नॅसडॅकही 4.5 टक्के इतका नुकसानीत होता. या निर्णयानंतर नाइके आणि अॅपलचे समभाग 7 टक्के घसरले. आयातीवर अवलंबून असणाऱ्या कंपन्या फाइव्ह बिलोव (14 टक्के), डॉलर ट्री (11 टक्के) व गॅप (8 टक्के) इतक्या घसरलेल्या दिसल्या. टेस्लासह एनव्हीडीयाचे समभाग घसरणीत होते.
चिंतेची कारणे
चीनवर सध्याच्या शुल्कानंतर एकंदर शुल्क आता 54 टक्के इतके असणार आहे. याने मंदीची स्थिती उदभवणार असल्याचे बोलले जात असून व्यापारावर परिणाम होणार आहे. याचाच थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. अमेरिकेतील कंपन्यांना यापुढे अधिक किमत मोजून वस्तु मागवाव्या लागणार आहेत. ‘मेक अमेरिका वेल्दी अगेन’ या ट्रम्प यांच्या धोरणाने जागतिक व्यापार व गुंतवणूकीचा माहोलच हादरलेला दिसतो आहे. आता यापुढे इतर देश याला कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.