For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेचा इराणवर जोरदार वायुहल्ला

06:23 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेचा इराणवर जोरदार वायुहल्ला
Advertisement

इराणकडून अमेरिकेला परिणाम भोगण्याचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी सुरु असतानच, अमेरिकेने इराणवर जोरदार वायूहल्ला चढविला आहे. या हल्ल्यात इराणची क्षेपणास्त्रनिर्मिती केंद्रे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील इराणच्या युद्धनौका यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. इराणने या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला असून अमेरिकेचे एक ड्रोन पाडल्याचे प्रतिपादन केले आहे. अमेरिकेने या हल्ल्यासाठी युद्धविमाने, क्षेपणास्त्रे आणि आधुनिक ड्रोन्सचा उपयोग केल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

आखाती प्रदेशात असणाऱ्या अमेरिकेच्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी हा हल्ला करण्यात आला. इराणच्या सैन्यदलांनी अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील सामरिक आस्थापनांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी आम्हाला, शस्त्रसंधी सुरु असतानाही हा हल्ला करावा लागला. हा शस्त्रसंधीचा भंग नसून आत्मरक्षेसाठी केलेली कृती आहे, असे स्पष्टीकरण अमेरिकेने केले आहे.

इस्रायलचाही हिजबुल्लावर हल्ला

अमेरिकेचा इराणवर हल्ला होत असतानाच इस्रायलनेही हिजबुल्लावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जण ठार झाल्याची माहिती आहे. ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हिजबुल्ला ही इराण समर्थित दहशतवादी संघटना असून ती प्रामुख्याने इस्रायलच्या विरोधात लेबेनॉनमधून कार्यरत आहे. इस्रायलने लेबेनॉनमध्ये बाँबफेक केली असून हिजबुल्लाची काही ठिकाणे नष्ट केली आहेत, अशी माहिती देण्यात आली. इस्रायलने गाझापट्टीवरही वायुहल्ला केलेला होता.

चर्चेवर काय परिणाम...

अमेरिकेने ‘आत्मसंरक्षणा’र्थ केलेल्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम दोन्ही देशांमध्ये हेत असलेल्या शांतता चर्चेवर कसा होईल, यावर आता चर्चा होऊ लागली आहे. दोन्ही देशांमधील चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असून बहुतेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे. हे युद्ध लवकरच थांबणार असून होर्मुझची सामुद्रधुनीही मुक्त होणार आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सोमवारीच केले होते. होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त होण्यासाठी एक महिना लागेल, असे स्पष्ट करत इराणनेही संकट दूर होण्याचा संकेत दिला होता. तथापि, इराणकडे असलेल्या संपृक्त युरेनियमच्या साठ्यावरुन चर्चा फिस्कटणार, अशीही लक्षणे सोमवारपासूनच दिसू लागली होती. इराणने त्याच्याकडील संपृक्त युरेनियमचा साठा पूर्णत: आंतरराष्ट्रीय देखरेखीत नष्ट करावा, किंवा तो अमेरिकेच्या आधीन करावा, अशी अट ट्रंप यांनी ठेवली होती. ती इराणने फेटाळली होती. संपृक्त युरेनियमचे साठे इराणकडेच राहतील. उलट अमेरिकेनेच इराणची 24 अब्ज डॉलर्सची जप्त केलेली संपत्ती करार होण्याआधी मुक्त करावी, अशी अट इराणने ठेवली आहे. त्यामुळे चर्चेत पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे.

आणखी एक नवी अट

आखातात शांतता निर्माण व्हायची असेल, तर सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननेही ‘अब्राहम अॅकॉर्डस्’वर स्वाक्षरी करावी, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. ‘अब्राहम अॅकॉर्डस्’ ही संकल्पना ट्रंप यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाच्या प्रथम कालखंडात (2016-2020) मांडली होती. या संकल्पनेमुळे इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित होणार होती आणि इस्रायल आणि मुस्लीम देश यांच्यात सख्य होणार होते., असे डोनाल्ड ट्रंप यांचे म्हणणे होते.

तेलदर पुन्हा वाढले

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढून 100 डॉलर्सच्यावर गेले आहेत सोमवारी ते 90 डॉलर्सपर्यंत आले होते. त्यामुळे तेलाचा भडका उडण्याची पुन्हा चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे अनेक देशांवर परिणाम होणार असून त्यांच्यात भारताचाही समावेश होत आहे.

आखातात युद्धाच्या भडक्याची चिन्हे

ड आखाती भागात पुन्हा युद्ध भडकण्याची दिसू लागली आहेत चिन्हे

ड अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडूनही सज्जता होत असल्याचे चिन्ह

ड ताज्या घडामोडीमुळे शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

ड इराणवर आणखी हल्ले करण्यासाची अमेरिकेची सज्जता असल्याचे वृत्त

Advertisement
Tags :

.