For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेचा इराणवर ‘बंकर बस्टर’ हल्ला

06:59 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेचा इराणवर ‘बंकर बस्टर’ हल्ला
Advertisement

इराणी संरक्षणव्यवस्थेची हानी, भूमीवर युद्ध होणार

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी, तेहरान

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या 32 व्या दिवशी अमेरिकेने इराणच्या इस्फाहान शहरावर घातक ‘बंकर बस्टर’ बाँबने आघात केला आहे. हा बाँब भूमीखालच्या बंकर्सना नष्ट करु शकतो. या हल्ल्यामुळे इराणच्या संरक्षण व्यवस्थेची मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. इस्फाहान येथील भूमीगत क्षेपणास्त्र साठ्याला या हल्ल्यात लक्ष्य बनविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

अमेरिकेने उपयोगात आणलेला हा बाँब 900 किलो किंवा 2000 पौंड वजनाचा होता. अशा घातक शस्त्राचा उपयोग या युद्धात प्रथमच करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे हा बाँब टाकण्यात आला. त्यामुळे इस्फाहान प्रचंड स्फोटाच्या दणक्याने हादरुन गेले होते. अनेक भूमिगत बंकर्स या बाँबने नष्ट केले असल्याचे अनुमान आहे. इराणने अद्याप यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

अनेकदा उपयोग

इराणने आपली संरक्षण साधने आणि शस्त्रास्त्रे भूमीगत भक्कम अशा भुयारांमध्ये साठविलेली आहेत. अमेरिका आणि इस्रायल यांना याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी या युद्धात अनेकदा बंकर बस्टर बाँबचा उपयोग केला आहे. तथापि, इतक्या मोठ्या वजनाचा बाँब मंगळवारी प्रथमच उपयोगात आणण्यात आला आहे.  आवश्यकता भासल्यास आणखी असे बाँब टाकू, असा इशारा अमेरिकेने दिला.

इटलीचा नकार

अमेरिकेला युद्धासाठी आपल्या तळांचा उपयोग करु देण्यास इटलीने नकार दिला आहे. स्पेनपाठोपाठ इटलीनेही नकार दिल्याने आता अमेरिकेने स्वबळावरच इराणविरोधात हल्लासत्र आरंभले आहे. आम्ही अद्याप आमची अतिघातक अस्त्रे आणलेली नाहीत. ती आणण्याच्या आतच इराणने शस्त्रसंधीस मान्यता द्यावी. अन्यथा इराणची अपरिमित हानी होईल, असा इशारा अमेरिकेने दिलेला आहे.

इराणचा दुबईवर हल्ला

इराणनेही मंगळवारी दुबईवर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे दुबईमध्ये काही स्थानी व्यवहार बंद करण्यात आले आहेत. इराणने इस्रायलवरही अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याने काही स्थानी आगी लागून हानी झाली आहे. मात्र, इस्रायलने बहुतेक क्षेपणास्त्रे आकाशातच निकामी केल्याची माहिती दिली. या युद्धात आता निम्म्याहून अधिक प्रगती झाली आहे, असे प्रतिपादन इस्रायलने केले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल बसविणार

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून नौकांची वाहतूक करण्यासाठी टोल लागू करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक अधिक महाग होईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अमेरिका आणि इस्रायल यांना या सामुद्रधुनीचा उपयोग करु दिला जाणार नाही, अशी घोषणा इराणने केली आहे. या धोरणामुळे आता त्याची भूमिका सौम्य झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेनेही युद्ध थांबविण्याचा संकेत देतानाच, भूमीवरील कार्यवाहीसाठीही सज्जता दर्शविल्याने युद्ध समाप्तीसंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे.

बंकर बस्टर बाँब म्हणजे काय...

ड वजन : पूर्ण बाँबचे 900 किलो किंवा 2000 र्पौड

ड क्षमता : साधारणत: 950 किलो अतिघातक स्फोटके

ड भेदकता : साधारणत: 3.4 मीटर पोलादी भिंतीचा भेद

ड मारकता : भूमीखाली कित्येक फूट मुसंडीनंतर स्फोट

ड अचूकता : लेसर गायडन्स तंत्रज्ञानाशी जोड, अचूक मारा

ड उपयुक्तता : भूमीखालील लक्ष्ये, खोलवरचे बंकर्स भेदणे

ड प्रभाव : स्फोटानंतर संपूर्ण लक्ष्याचा पूर्ण विध्वंस होणे शक्य

Advertisement
Tags :

.