आणखी भडकले अमेरिका-इराण युद्ध
ओमान समुद्रात एका भारतीयाचा मृत्यू, इराणवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले, भारताचे शांतीचे प्रयत्न
वृत्तसंस्था / तेल अवीव, तेहरान
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता आणखीनच भडकले आहे. सोमवारी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानच्या मध्यवर्ती भागांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यात इराणच्या युद्धसामग्रीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे वृत्त आहे. इराणनेही अबुधाबी, दुबई, कतार, कुवेत आणि सौदी अरेबिया या अमेरिकेच्या मित्रदेशांना क्षेपणास्त्रे आणि ड्रेन्स यांच्या साहाय्याने लक्ष्य केले आहे. सौदी अरेबियातील इंधन तेल उत्पादन केंद्राला आग लागली असून ते बंद करण्यात आले आहे. इस्रायलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा इराणने केलेला दावा इस्रायलने पूर्णत: फेटाळून लावला आहे.
सोमवारी दुपारी ओमानच्या समुद्रतटावरील एक तेलवाहू नौकेवर इराणच्या क्षेपणास्त्र आदळल्याने एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. त्याचे नाव त्वरित समजू शकले नाही. ही तेलवाहू नौका मार्शल आयलँडस् या देशाची होती. तिच्यावर 21 खलाशी होते. त्यांच्यापैकी 18 जणांची सुटका करण्यात आली आहे. आखाती प्रदेशातील विविध देशांमध्ये अनेक भारतीय अडकलेले असून त्यांची सुटका करण्यात येईल, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
युद्ध थांबविण्याचे आवाहन
आखातातील युद्धामुळे आम्ही चिंताक्रांत झालो आहोत. हे युद्ध त्वरित थांबावे. सर्व संबंधित देशांनी त्यांच्यातील समस्या चर्चा आणि सामोपचाराच्या मार्गाने सोडवाव्यात, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. युद्धास प्रारंभ झाल्यानंतर इराणने होरमुसची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. शांततेच्या मार्गाने वाटाघाटी करुन समस्या सुटाव्यात आणि या प्रदेशात स्थैर्य निर्माण व्हावे. तसे झाल्यास पुरवठा साखळ्याही सुरळीत होतील, अशी भारताची सातत्यपूर्ण भूमिका आहे.
फ्रान्सही युद्धात उतरणार
इराणच्या विरोधात युद्धात उतरण्याची घोषणा फ्रान्सने केली आहे. अद्याप हा देश प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेला नाही. तथापि, इराणला धडा शिकविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कोणत्याही क्षणी इराणच्या विरोधात आम्ही युद्धात सहभागी होऊन शकतो, असे फ्रान्सच्या प्रशासनाने स्पष्ट केल्याने युद्धाची व्याप्ती वाढणार आहे. फ्रान्स आपली युद्ध विमाने आणि नौका आखातात पाठवण्यास सज्ज आहे.
इराणमध्ये कार्यवाहक संरक्षणमंत्री
इराणचे संरक्षणमंत्री अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याने इराणने सय्यद मजीद इब्न अल् रेझा यांची नियुक्ती कार्यवाही संरक्षणमंत्री म्हणून केली आहे. अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही, अशी घोषणा रेझा यांनी त्यांची नियुक्ती या पदावर केल्यानंतर त्वरित केली. त्यामुळे चर्चेचा प्रारंभ होण्यापूर्वीच तिच्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले असल्याचे दिसून येत आहे.
ब्रिटनच्या तळावर इराणचा हल्ला
ब्रिटनच्या सैनिकी तळावर इराणने सोमवारी सकाळी क्षेपणास्त्र हल्ला केला. हा तळ सायप्रस या देशात आहे. एक क्षेपणास्त्र या तळावर आदळल्याने स्फोट होऊन परिसरात धूर पसरला होता. हल्ल्यात या तळाची किरकोळ हानी झाली. ब्रिटनने यासंदर्भात इराणचा निषेध केला असून हल्ले थांबवावेत असे आवाहन केले आहे.
इराणचे युएनला पत्र
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे धार्मिक प्रमुख अणि देशाचेही राजकीय प्रमुख अयातोल्ला अली खामेनेई ठार झाले. या घटनेचा निषेध करणारे पत्र इराणनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष अँटोनिओ गुट्रेस आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष जेम्स करियुकी हे पत्र पाठविण्यात आले असून त्यात अमेरिका आणि इस्रायल यांची निर्भत्सना करण्यात आली आहे.
इस्रायलचा हिजबुल्लावर हल्ला
सोमवारी सकाळपासूनच इस्रायलच्या वायुदलाने शेजारच्या देशांमधील हिजबुल्लाच्या प्रभावक्षेत्रांमध्ये क्षेपणास्त्र आणि विमान हल्ले केले. या हल्ल्यात हिजुबल्लाचे अनेक हस्तक ठार झाल्याचा दावा करण्यात आला. हिजबुल्लाने प्रतिहल्ला केल्यास लेबेनॉनची भूमी हस्तगत केली जाईल, असा इशारा इस्रायलने दिला. हिजबुल्ला ही इराणनेच पोसलेली दहशतवादी संघटना आहे. तिचे प्रभावक्षेत्र सिरीया, लेबेनॉन आणि जॉर्डन या इस्रायलशेजारच्या देशांमध्ये आहे. तेथून इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्यामुळे इस्रायलने इराणवर हल्ला करतानाच हिजबुल्लाचीही हानी करण्याचे धोरण ठेवले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
इराणचे 131 प्रदेश प्रभावित
अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे इराणचे 131 उपप्रदेश प्रभावित झालेले आहेत. हे उपप्रदेश (काऊंटीज) इराणच्या 31 प्रांतांमध्ये पसरलेले आहेत. या प्रांतांमध्ये राजधानी तेहरान, इस्फाहान, सिराज आणि तरबेझ या चार राजकीय आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या प्रांतांचा समावेश आहे. ही माहिती रेड क्रिसेंट या संस्थेने सोमवारी दिली. रेड क्रिसेंट ही मुस्लीम देशांमधील वैद्यकीय सेवाभावी संस्था आहे. या संस्थेने इराणमध्ये युद्धपिडितांसाठी साहाय्यता कार्य करण्यास प्रारंभ केला असून हल्ले होत असतानाही हे कार्य केले जात आहे.
सोमवारी दिवसभर हालचाली
ड सोमवारी दिवसभर युद्धक्षेत्रात जोरदार हालचाली, अनेक हल्ले-प्रतिहल्ले
ड नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलने फेटाळला
ड इराणचे जवळपास 85 नागरी आणि लष्करी अधिकारी आतापर्यंत ठार