अमेरिका-इराण तणावाने बिघडवला शेअर बाजाराचा मूड
सेन्सेक्स 307 अंकांनी नुकसानीत, निफ्टीत 95 अंकांची घसरण, मेटल निर्देशांक दबावात
वृत्तसंस्था, मुंबई
अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला असून कच्च्या तेलाला उकळी आल्याने सोमवारी भारतीय शेअरबाजारात दबावाचे वातावरण राहिले होते. सेन्सेक्स 307 अंकांनी तर निफ्टी 95 अंकांनी घसरणीसह बंद झाला. मेटल आणि एफएमसीजी समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 307 अंकांच्या घसरणीसह 76,957 वर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टीदेखील 95अंकांनी घसरून 24,080 वर बंद झाला. आशियाई बाजारात दबाव निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारातही विक्रीचे वादळ सुरू झाले. या दबावाखाली सेन्सेक्स 513 अंकांपर्यंत घसरला होता आणि निफ्टीही 24000 च्या खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. व्यापक स्तरावरही विक्रीचा दबाव कायम राहिला. मिडकॅपमध्ये मात्र रिकव्हरी दिसून आली. निफ्टी स्मॉलकॅप 100 सुरुवातीच्या व्यवहारात अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीतून सावरला आणि अखेर चांगल्या वाढीसह बंद झाला. मात्र, निफ्टी मिडकॅप 100 अर्ध्या टक्क्यांहून अधिक नुकसानीसोबत बंद झाला.
खाजगी बँका आणि फार्मा कंपन्यांनी बाजारात तेजीसह कार्यरत राहण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, धातू आणि एफएमसीजी निर्देशांकानी नकारात्मक कामगिरी करत बाजारात दबाव वाढवला. आयटी क्षेत्राची सावरताना धडपड दिसली. अखेर हा निर्देशांक अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी घसरणीत राहिला. निफ्टी फार्मा अर्ध्या टक्क्यांहून अधिक, निफ्टी मेटल अडीच टक्क्यांनी आणि निफ्टी एफएमसीजी दीड टक्क्यांहून अधिक घसरले. 28 ऑगस्ट 2026 रोजी बीएसईवर सूचीबद्ध सर्व समभागांचे एकूण बाजार भांडवल मूल्य 4,94,12,415.27 कोटी रुपये होते. जे 31 ऑगस्ट 2026 रोजी 4,90,33,359.29 कोटींवर आले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 379,055.98 कोटींची घट झाली.
सेन्सेक्समध्ये 30 पैकी फक्त 10 समभाग वधारत बंद झाले. सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक सर्वाधिक वाढीसह बंद झाले. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स, आयटीसी आणि एअरटेल सर्वाधिक नुकसानीसह बंद होताना दिसले. बीएसईवर 4680 शेअर्समध्ये व्यवहार झाले. यामध्ये 1858 शेअर्स वाढले आणि 2572 घसरले. 205 समभाग एका वर्षाच्या उच्चांकावर आणि 147 समभाग एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले.