For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेकडून भारतावर 27 टक्के कर

07:00 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेकडून भारतावर 27 टक्के कर
Advertisement

ट्रम्प यांच्याकडून प्रतिद्वंद्वी करांची घोषणा : चीनवर 34 टक्के, इतर अनेक देशांवरही कर, रशियाचा मात्र अपवाद

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिद्वंद्वी (रेसिप्रोकल) करांची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवर सरासरी 27 टक्के कर लागू करण्यात आला आहे. तथापि, अनेक वस्तू या नव्या धोरणानुसारही करमुक्त ठेवण्यात आल्या आहेत. भारत सरकारच्या प्रथमदर्शनी प्रतिक्रियेनुसार या कराचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. अनेक तज्ञांचेही हेच मत आहे.

Advertisement

ट्रम्प यांनी कर लागू करताना चीनसंबंधी अधिक कठोर भूमिका घेतली असून त्या देशावर 34 प्रतिशत कर लागू केला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान 27 टक्के, श्रीलंका 44 टक्के आणि बांगलादेश 37 टक्के हे भारताच्या अवती-भोवती असणाऱ्या देशांवर लावलेल्या कराचे प्रमाण आहे. सर्वाधिक कर कंबोडिया या देशावर लागू करण्यात आला असून तो 49 टक्के आहे. अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या 25 देशांवर हा कर लावण्यात आला आहे. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यावर अमेरिकेनेच प्रतिबंध लादल्याने त्यांचा समावेश या सूचीत करण्यात आलेला नाही. अध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत या करधोरणाची घोषणा केली. ‘लिबरेशन ऑफ अमेरिका’ किंवा अमेरिकेचे स्वातंत्र्य ही संज्ञा त्यांनी आपल्या या उपक्रमाला दिली आहे.

अमेरिकेचे झाले शोषण

आजवर अन्य अनेक देशांनी अम्।sरिकेच्या उदार कर धोरणाचा अवांछनीय लाभ उठवून अमेरिकेचे आर्थिक शोषण केले आहे. आता आम्ही याची परतफेड करीत आहोत. अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवर अमेरिकेने आजवर केवळ 2.5 प्रतिशत कर लावला होता. इतर देश मात्र अमेरिकेतून त्यांच्या देशांमध्ये निर्यात केल्या गेलेल्या वस्तूंवर प्रचंड कर लावत आहेत. यामुळे या देशांमध्ये होणारी अमेरिकेची निर्यात मंदावली असून याचा परिणाम म्हणून अमेरिकेतील उत्पादन आणि रोजगारी निर्मिती थंडावली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारताचा विषेश उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी घनिष्ट मैत्री आहे. म्हणून मी भारताला या करातून काही प्रमाणात सवलत देत आहे. त्यामुळे भारतावर 27 प्रतिशत कर लावला आहे, असा आवर्जून उल्लेख ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेत केला. ज्या देशांशी अमेरिकेचा मोठ्या प्रमाणात व्यापार आहे आणि ज्या देशांचा या व्यापारात अवास्तव लाभ झाला आहे, त्या देशाविरोधात हा कर लावला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे धोरण अमेरिकेच्या हिताचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

भारताचे प्रतिपादन

ट्रम्प यांच्या नव्या करधोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विशेष परिणाम होणार नाहीत. भारताची अर्थव्यवस्था कणखर आहे. तरीही ट्रम्प यांच्या धोरणाचा सखोल अभ्यास केला जात आहे. या अभ्यासानंतर उपाययोजना केली जाईल. प्रथमदर्शनी कोणतीही चिंता करावी लागेल असे वाटत नाही, असे प्रतिपादन भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक व्यापार करार करण्याच्या दृष्टीने चर्चाही केली जात आहे. ही चर्चा सकारात्मक वातावरणात होत आहे. त्यामुळे भारत आजच सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, अशी भारताची भूमिका गोयल यांनी स्पष्ट केली आहे.

अमेरिकेवर परिणाम शक्य

अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जगात बलशाली करण्याचा ट्रम्प यांचा विचार असला तरी प्रत्यक्षात या कररचनेमुळे अमेरिकेची हानी होण्याची शक्यता आहे. अनेक आयात वस्तूंवर अतिरिक्त कर लावल्याने या वस्तू अमेरिकेतच महाग होऊ शकतात. तसेच इतर देशांनी अमेरिकेविरोधात आघाडी उघडल्यास जागतिक स्तरावर एका नव्या व्यापार युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या या धोरणाकडे सारे जग सध्या सावधपणे आणि काहीशा साशंकतेने पहात असल्याचेही मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले असून या धोरणाचा लाभ अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांनाच होईल, असा अनेकांची भावना आहे.

भारतावर कर नेमका किती...

ट्रम्प यांनी प्रदर्शित केलेल्या कोष्टकानुसार भारतावर 26 टक्के कर लावल्याचे दिसून येत आहे. तथापि, नंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत सूचीत भारतावर 27 टक्के कर लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गोंधळ उडाला असून नेमका कर किती हा प्रश्न निर्माण झाला. सध्या हा कर 27 टक्के असल्याचे गृहित धरुन भारताच्या व्यापार विभागाने पुढच्या सज्जतेला प्रारंभ केला.

कोणते देश, किती कर...

चीन 34, युरोपियन महासंघ 20, दक्षिण कोरिया 25, भारत 27,  व्हिएतनाम 46, तैवान 32, जपान 24, थायलंड 36, स्वित्झर्लंड 31, इंडोनेशिया 32, मलेशिया 24, कंबोडिया 49, ब्रिटन 10, दक्षिण आफ्रिका 30, ब्राझील 10, बांगलादेश 37, सिंगापूर 10, इस्रायल 17, फिलिपाईन्स 17, चिली 10, ऑस्ट्रेलिया 10, पाकिस्तान 29, तुर्किये 10, श्रीलंका 44, कोलंबिया 10.

भारताच्या कोणत्या वस्तू करमुक्त...

जेनेरिक औषधे, इन्शुलिन, अ जीवनसत्वयुक्त औषधे, ब 2 जीवनसत्वयुक्त औधधे, ब 6 जीवनसत्वयुक्त औषधे, फॉलिक अॅसीड, निआसिन इत्यादी औषधे, लाकडाच्या वस्तू, तांबे आणि तांब्याच्या वस्तू, सेमीकंडक्टर्स, वीज उत्पादनासाठी आवश्यक खनिजे, जस्त, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम आदी धातू, सोने, चांदी आदी मौल्यवान धातू, पेपरबोर्ड, मुद्रित पुस्तके आणि ग्रंथ, मुद्रित शब्दकोष, चित्रकलेसाठी आवश्यक कागद, नकाशे, मुद्रित कोष्टके, हैड्रोग्राफिक्स आणि जाहिरात साधने यांना करापासून मुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताचा होणार लाभ

भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कापड आणि वस्त्रप्रावरणांची निर्यात करतो. या वस्तूंवर जरी कर लावण्यात आला असला तरी तो इतर अनेक देशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या वस्तूंची अमेरिकेला होणारी भारताची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य अशा अनेक वस्तू आहेत की ज्या भारतातून निर्यात होतात पण अमेरिकेत त्या करमुक्त आहेत. भारताच्या जेनेरिक औषधांना अमेरिकेत मोठी बाजारपेठ आहे. भारत अमेरिकेला प्रतिवर्ष 12.7 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. ही औषधे करमुक्त ठेवल्यानेही भारताची महत्वाची चिंता दूर झाली आहे.

कही खुशी, कही गम

  • ट्रम्प यांच्या करधोरणात अनेक भारतीय वस्तू करमुक्त असल्याने समाधान
  • भारताच्या अवती-भोवतीच्या देशांच्या तुलनेत भारतावर कर कमी प्रमाणात
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी घनिष्ट मित्र असल्याने भारताला करात काही सवलत
Advertisement
Tags :

.