अमेरिकेचे एफ-35 लढाऊ विमान कोसळले
लँडिंगदरम्यान दुर्घटना : वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने वाचविला जीव
वृत्तसंस्था/ अलास्का
अमेरिकेचे अत्याधुनिक लढाऊ विमान एफ-35 अलास्कामध्ये कोसळले आहे. विमानाच्या वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने स्वत:चा जीव वाचविला आहे. ही दुर्घटना अलास्काच्या एयेल्सन एअर फोर्स बेसवर प्रशिक्षणादरम्यान घडली आहे. दुर्घटना भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे 3 वाजून 19 मिनिटांनी घडली.
वैमानिकाला उ•ाणादरम्यान विमानात बिघाडाला सामोरे जावे लागले होते. यामुळे लँडिंगदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. दुर्घटनेनंतर वैमानिक सुरक्षित आहे. हे विमान सिंगल सीटर लढाऊ विमान होते अशी माहिती अमेरिकेच्या वायुदलाच्या 354 व्या फायटर विंगचे कमांडर कर्नल पॉल टाउनसेंड यांनी दिली आहे. एफ-35 लढाऊ विमान हे पाचव्या पिढीचे विमान असून याची निर्मिती लॉकहीड मार्टिन कंपनीने केली आहे.
भारताला विमाने विकण्याची इच्छा
फेब्रुवारी 2024 मध्ये बेंगळूर येथे झालेल्या एअरो इंडिया शोमध्ये अमेरिकेने एफ-35 लढाऊ विमानाचे सादरीकरण केले होते. अमेरिकेने एअरो इंडिया शोमध्ये 27 वर्षांच्या इतिहासात स्वत:चे सर्वात मोठे प्रतिनिधिमंडळ पाठविले होते. एफ-35 लढाऊ विमानांची खरेदी भारताने करावी यासाठी अमेरिकेचे प्रशासन प्रयत्नशील आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या इतिहासातील सर्वात महागडे विमान एफ-35 हेच आहे.