For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाझापट्टीच्या पुनर्वसनावरून अमेरिका युरोप द्वंद

06:50 AM Feb 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
गाझापट्टीच्या पुनर्वसनावरून अमेरिका युरोप द्वंद
Advertisement

बेंजामिन नेतन्याहू यांना बसण्यासाठी खुर्ची सरकवून मदत करणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा नवा अवतार पाहून जगभरात तो एक चर्चेचा विषय बनलेला आहे. इस्त्रायली पंतप्रधानांना खुष करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टीमधून पॅलेस्टाईन नागरिकांना हटवून तिथे पुनर्बांधणी करण्याचा विचार बोलून दाखवताच नेतन्याहू यांनी संमती दर्शविली तर आखाती देशांसहीत युरोपियन देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांच्या भेटीसाठी व्हाईट हाऊसमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय नेत्याचे आगमन झाले ते इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी इस्त्रायली पंतप्रधानांना पाचारण केले. इस्त्रायली पंतप्रधान व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले. त्यानंतर बैठक सभागृहात नेतन्याहूसाठी खुर्ची सरकवून ते बसल्यानंतर आपण आसन ग्रहण केल्याचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर तो सर्वत्र ट्रेंड होऊ लागला. या घटनेनंतर झालेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टीमधून पॅलेस्टाईन नागरिकांना हलवून त्यांचे पुनर्वसन करणार असल्याची घोषणा बऱ्याच देशांना बोचू लागली.

इस्त्रायलवर हल्ला करून हमास दहशतवादी संघटनेने 1200 नागरिकांना ठार केले तर साधारणत: 250 इस्त्रायली नागरिकांचे अपहरण केले होते. त्यातील 76 अपहृत नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. ऑक्टोबर 2023 मधील हमासच्या हल्यानंतर इस्त्रायलने पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीवर जोरदार हल्ले केले. यात गाझापट्टीमधील 80 टक्के वस्ती जमिनदोस्त करण्यात आली आहे. या गाझापट्टीचे पुनर्वसन करण्याचा विडा नव्याने निवडून आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलला आहे. पुनर्वसनावेळी गाझापट्टीमधून सर्व पॅलेस्टाईन नागरिकांनी जॉर्डन व इजिप्तमध्ये आश्रय घेण्याची सूचना केली आहे. त्यासंबंधीची घोषणा इस्त्रायली पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जगभरात एकच गोंधळ माजला.

Advertisement

गाझापट्टी संबंधी केलेल्या वक्तव्यानंतर अरब व अन्य मुस्लिम राष्ट्रांनी या योजनेला विरोध केलेला असून अमेरिकेने यात नाक खुपसू नये असा सल्ला दिलेला आहे. या प्रश्नावर युरोपने संघटितपणे अमेरिका विरोधात आपली भूमिका जाहीर केलेली आहे. जर्मन सरकारने गाझापट्टीवरील पॅलेस्टाईन नागरिकांचा हक्क अबाधीत ठेवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तर इंग्लंड आणि फ्रान्स सरकारने पॅलेस्टाईन नागरिकांच्या बाजूने आपले मतप्रदर्शन केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी गाझापट्टीवर कब्जा करण्याचे कोणतेही प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा दिलेला आहे.

इस्त्रायल अस्तित्वात आल्यापासून अमेरिकेने आपले पूर्ण सामर्थ्य या देशाला दिलेले आहे. इस्त्रायल विकसीत व श्रीमंत देश असून अमेरिकेच्या शस्त्र भंडाराचा मोठा ग्राहक आहे. गतवर्षी हमास व हिजबुल्लाबरोबर दोन हात करताना इस्त्रायलने अमेरिकेकडून 20 अब्ज डॉलर्स शस्त्रास्त्रांची खरेदी केली होती. एकविसाव्या शतकातील ही एक मोठी शस्त्र खरेदी ठरलेली आहे.

हमास प्रमुख इस्माईल हनिए यांची इराणच्या राजधानीत हत्या केल्यानंतर इराण व त्याच्या मित्र राष्ट्रांकडून होणारा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी इस्त्रायलने ही खरेदी केली होती. यामुळे अमेरिकेची डेमोक्रॅट असो वा रिपब्लिकन पक्षाची राजवट सदोदित इस्त्रायलच्या पाठिशी सदैव उभी राहते. इराणबरोबर झालेल्या तणावावेळी मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या दोन विमानवाहू नौका इस्त्रायलच्या संरक्षणासाठी तैनात केल्या होत्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मागील कार्यकाळातही इस्त्रायलसाठी आपले राजनैतिक व कुटनितीक पाठबळ दिले होते. इस्त्रायलने आपली राजधानी तेल अवीवमधून गाझापट्टीतील गोलान हाईट परिसरातील जेरुसलैम येथे हलवली असता जगभरातून विरोधाचा सूर निघत होता. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही इस्त्रायलवर दबाव आणला होता.

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 साली सत्ता हाती घेतल्यानंतर अमेरिकेचा राजदूतावास तेलअवीवमधून जेरुसलैम येथे स्थलांतरीत करून नव्या राजधानीला मान्यता दिली होती. तसेच इस्त्रायलचा विरोध डावलून बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली युरोपियन देशांनी इराणबरोबर केलेला अण्वस्त्र करार ट्रम्प यांनी मोडीत काढला होता. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या पुढाकाराने बहरीन, संयुक्त अरब अमिरात, मोरोक्को व सुडान या देशांना अब्राहम कराराअंतर्गत इस्त्रायलबरोबर मैत्री समझोता घडवून आणला होता.

नव्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळातील अमेरिका भेटीचे पहिले निमंत्रण इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना देऊन त्यांचा सन्मान करतानाच गाझापट्टी इस्त्रायलला भेट देण्याचा इरादा जाहीर केला. ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेने जगाच्या राजकीय पटलावर त्यांनी नव्या वादळाला वाट मोकळी करून दिलेली आहे. या प्रश्नावर युरोप आणि अमेरिका आता पुन्हा एकदा आमने सामने आलेली आहेत.

प्रशांत कामत

Advertisement
Tags :

.