For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेचे शिष्टमंडळ येणार भारतात

06:42 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेचे शिष्टमंडळ येणार भारतात
Advertisement

व्यापार चर्चेला वेग येणार, कराराच्या प्रथम टप्प्याला अंतिम रुप मिळणे शक्य

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारसंबंधीच्या चर्चेची पुढची फेरी भारतात होणार आहे. यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाचे एक शिष्टमंडळ भारतात येणार आहे. ही चर्चा 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर अशी 3 दिवस चालणार असून दोन्ही देशांमधील संभाव्य व्यापार कराराच्या प्रथम टप्प्याच्या आशयाला या चर्चेनंतर अंतिम रुप दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, ही चर्चा ‘अनौपचारिक’ आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिष्टमंडळ 9 डिसेंबरला रात्री भारतात येईल, अशी शक्यताही सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement

या अमेरिकन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व अमेरिकेच्या व्यापार विभागाचे उपप्रतिनिधी रिक स्टिटझर करणार आहेत. अमेरिकेने भारतावर 25 टक्के व्यापारी शुल्क आणि 25 टक्के अतिरिक्त शुल्क लागू केल्यानंतरची अमेरिकन प्रतिनिधीमंडळाची ही दुसरी भारतभेट होणार आहे. या भेटीत व्यापार करार चर्चा आणखी पुढे नेण्यात येईल, असे भारताच्या बाजूकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आशावाद जागृत

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासंबंधात गेले जवळपास 10 महिने चर्चा केली जात आहे. तथापि, अद्यापही करार दृष्टीपथात आलेला नाही. काही मुद्द्यांवरील मतभेद दूर न झाल्याने कराराला अंतिम स्वरुप देण्यात विलंब लागत आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. जेव्हा दोन्ही देशांना लाभदायक ठरेल, असा मुद्द्यांवर एकमत होईल, तेव्हाच कराराला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. या कराराचा प्रथम टप्पा लवकर पूर्ण करण्याचा दोन्ही देशांचा विचार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, निश्चित वेळापत्रक अद्याप देण्यात आलेले नाही. मात्र, थोड्या विलंबाने का असेना, हा करार निश्चितपणे होईल, असा आशावाद जागृत असून, दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी यासंबंधी सकारात्मक व्यक्तव्ये केली आहेत.

राजेश अग्रवाल यांचे वक्तव्य

भारताच्या व्यापार विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या करारासंबंधात काही दिवसांपूर्वी सकारात्मक वक्तव्य केले आहे. त्यानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत व्यापार कराराची रुपरेषा निर्धारित करण्यात यश मिळणार आहे. संपूर्ण व्यापार करार एकदम न करता तो टप्प्याटप्प्याने करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत. कराराच्या प्रथम टप्प्यात काही महत्वाच्या वस्तू आणि सेवा यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेने भारतावरचे कर कमी करावेत, या दृष्टीनेही प्रयत्न भारताच्या बाजूकडून केला जाणार आहे.

दोन मुद्द्यांवर समांतर चर्चा

सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात दोन मुद्द्यांवर समांतर चर्चा होत आहे. प्रथम मुद्दा प्रतिद्वंद्वी व्यापारी शुल्काचे स्वरुप ठरविण्यावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे, तर दुसरा मुद्दा एक सर्वंकष आणि उभयपक्षी लाभदायक व्यापार कराराचे प्रारुप सज्ज करण्याचा आहे. या दोन्ही मुद्द्यांवर एकाच वेळी, पण भिन्न पातळीवर चर्चा होत आहे. दोन्ही देशांमधील उद्योगजगतही या चर्चेवर लक्ष ठेवून आहे. हा करार झाल्यास दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठा व्यापारी भागीदार

अमेरिका हा भारताचा आजही सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. दोन्ही देशांमध्ये साधारणत: 132 अब्ज डॉलर्सचा व्यापार असून भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात साधारणपणे 87 अब्ज डॉलर्सची आहे. तर अमेरिकेची भारताला होणारी निर्यात 47 अब्ज डॉलर्सची आहे. अमेरिकेच्या एकंदर आयातीपैकी 18 टक्के आयात ही भारताकडून होत असते. तर भारताच्या आयातीत अमेरिकेचा वाटा साधारणत: 7 टक्के आहे. हा व्यापार वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चर्चा सफल होण्याचा आशावाद

ड भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा यशस्वी करण्याचे प्रयत्न

ड सर्वंकष व्यापार करार आणि व्यापार शुल्क या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा

ड या व्यापार कराराचा प्रथम टप्प्या या वर्षअखेर पूर्ण करण्यासाठी हालचाल

ड अमेरिका आजही भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, निर्यातही मोठी

Advertisement
Tags :

.