‘बायजूस’च्या संस्थापकांना अमेरिकन न्यायालयाचा दंड
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
‘बायजूस’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांना अमेरिकेच्या न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सुनावणीसाठी वारंवार गैरहजेरीमुळे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे न्यायालयाने त्यांना 107 कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे 9,591 कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने ‘बायजूस’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांना अल्फा फंड्सचे संपूर्ण खाते सादर करण्याचे निर्देश दिले. तथापि, ‘बायजूस’ला न्यायालयाने लादलेला दंड ताबडतोब भरावा लागणार नाही. तथापि, रवींद्रनसाठी हा एक मोठा धक्का असून तो उच्च न्यायालयाने रद्द केला नाही तर त्याला आदेशाचे पालन करण्यास भाग पाडले जाईल.
डेलावेअर येथील न्यायालयाचे न्यायाधीश ब्रेंडन शॅनन यांनी 20 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात ‘बायजूस’च्या अल्फा आणि ‘बायजूस’च्या अमेरिकन वित्तीय युनिटला गैरवापर आणि निधी लपविल्याबद्दल जबाबदार धरले आहे. ‘बायजूस’च्या अल्फा युनिटची रचना 2021 मध्ये करण्यात आली होती. त्याचा उद्देश जागतिक कर्जदारांच्या संघाकडून ‘बायजूस’साठी अंदाजे 120 कोटी डॉलर्सचे मुदत कर्ज उभारणे हा होता. त्यांचा स्वतंत्र ऑपरेटिंग व्यवसाय नव्हता, म्हणून त्यांनी संपूर्ण कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी होल्डिंग एंटिटी म्हणून काम केले. या युनिटद्वारे 55.3 कोटी डॉलर्स इतकी मोठी रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. हे पैसे मियामीस्थित हेज फंड असलेल्या कॅमशाफ्ट कॅपिटलला आणि तेथून बायजू आणि इतर संबंधित संस्थांना पाठवण्यात आले होते. या व्यवहारात ‘बायजूस’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांची थेट भूमिका असल्याचे न्यायालयाने आढळून आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर निर्णय देण्यात आला.