For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-कॅनडा व्यापार चर्चा असफल

06:25 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका कॅनडा व्यापार चर्चा असफल
Advertisement

कॅनडावर 50 टक्के शुल्क आजपासून लागू होणार

Advertisement

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन डीसी

अमेरिका आणि कॅनडा या देशांमधील व्यापार विषयक चर्चा असफल ठरली आहे. दोन्ही देश आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने बोलणी फिस्कटली, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कॅनडाकडून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली असून ती शनिवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आलेली आहे.

Advertisement

या कराचा परिणाम कॅनडाकडून अमेरिकेला केल्या जाणाऱ्या 20 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंच्या निर्यातीवर होणार आहे. हे प्रमाण दोन्ही देशांमधील एकंदर व्यापाराच्या प्रमाणाच्या पाच टक्के आहे. कॅनडातून अमेरिकेला हॉकी स्टीक्स, टंग डीप्रेसर्स अशासारखी उत्पादने निर्यात केली जातात. त्यांच्यावरील करात आता मोठी वाढ होणार असली, तरी या दोन्ही देशांमधील एकंदर व्यापारावर या वाढीव आयात शुल्काचा विशेष परिणाम होणार नाही, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावात कॅनडाकडून शेवटच्या क्षणी परिवर्तन करण्यात आले. त्यामुळे ही चर्चा अपयशी ठरली, असा आरोप अमेरिकेने केला.

कॅनडाचे प्रत्युत्तर

व्यापार शुल्कात वाढ केल्यामुळे अमेरिकेचा कोणताही लाभ होणार नाही किंवा कॅनडाची हानी होणार नाही. कॅनडाही अमेरिकेच्या या निर्णयाला जशास तसे प्रत्युत्तर देईल. हे प्रत्युत्तर प्रत्येक डॉलरगणिक असेल, अशा इशारा कॅनडाने दिला आहे. अमेरिकेच्या दबावात येऊन आम्ही निर्णय घेणार नाही. आम्ही आमच्या देशाचा विचार करीत आहोत, असे प्रत्युत्तर कॅनडाचे नेते मार्क कर्नी यांनी दिले.

जगभरात सावधता

अमेरिकेने कॅनडावर लागू केलेल्या कराचा परिणाम केवळ या दोन देशांवर होणार नाही, तर अमेरिकेचे अनेक मित्रदेशही या अपयशी चर्चेमुळे सावध होतील, असा इशारा काही तज्ञांनी दिला आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्या प्रत्येक वर्षी साधारणत: 880 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार होत असतो. या व्यापारातील काही भागावर या करांचा परिणाम होणार असला, तरी भावनिकदृष्ट्या ही शुल्कवाढ अमेरिकेच्या हितांनाही बाधित करु शकते, असा इशारा दिला गेला आहे.

कॅनडात संतप्त भावना

अमेरिकेने व्यापार शुल्कात वाढ केल्याने कॅनडाच्या जनतेत संतापाची भावना आहे. कॅनडातून अमेरिकेच्या राजदूताची हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.  या मागणीच्या प्रस्तावावर कॅनडातील 2 लाख 48 हजार नागरीकांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र, अमेरीकेच्या बाजारपेठेवर कॅनडा मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. कॅनडातून जी एकंदर निर्यात केली जाते, तिच्या 72 टक्के निर्यात केवळ अमेरिकेला केली जाते. ही बाबही तितकीच महत्वाची आहे.

Advertisement
Tags :

.