इराणच्या पाच शहरांवर अमेरिकेचा बॉम्बहल्ला
सलग अकराव्या रात्री हल्ले; अमेरिकेकडून युद्धावर 3.6 ट्रिलियन रुपये खर्च
वृत्तसंस्था/ तेहरान, वॉशिंग्टन
अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणच्या पाच शहरांवर एकाचवेळी हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. चाबहार, कोनारक, तब्रीझ, बेहबहान आणि ओमिदियेह या शहरांना लक्ष्य करण्यात आले. युद्धविराम संपल्यापासून अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची ही सलग अकरावी रात्र होती. हवाई हल्ले सुरू ठेवतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. अमेरिका इराणच्या संशयित अणु ठिकाण, पिकॅक्स माउंटनवर लवकरच आणि खूप मोठा हल्ला करू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना ‘जर हे हल्ले सुरूच राहिले, तर या प्रदेशातील युद्ध वाढू शकते’ असे इराणने स्पष्ट केले. दरम्यान, या युद्धावरील अमेरिकेचा खर्च 37.5 अब्ज डॉलर्स (अंदाजे 3.6 ट्रिलियन रुपये) पर्यंत पोहोचल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी बुधवारी सांगितले.