बारा देशांच्या नागरीकांना अमेरिकाबंदी
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
बारा देशांच्या नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच इतर अनेक देशांच्या नागरीकांवर अमेरिकेत प्रवेशासाठी कठोर निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यासंबंधीच्या अध्यादेशावर बुधवारी स्वाक्षरी केल्याने हे नियम आता लागू झाले आहेत. अफगाणिस्तान, म्यानमार (बर्मा), छाड, काँगो, इक्वेटोरियल गिनीया, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या बारा देशांच्या नागरीकांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाणार आहे. तर बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लोने, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांच्या नागरीकांवर अमेरिका प्रवेशासाठी मर्यादा आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती आहे.
कोलोरॅडो येथील हल्ला
अमेरिकेतील प्रांत कोलोरॅडो येथील बोल्डर येथे नुकताच एक दहशतवादी हल्ला झाला होता. एका शांततापूर्ण सभेवर हा हल्ला करण्यात आला होता. हमासने सर्व इस्रायली बंधकांची त्वरित सुखरुप सुटका करावी, या मागणीसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एका दहशतवाद्याने कार घुसवून हा हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
अवैध लोकांना प्रवेश नाही
अमेरिकेत यापुढे बेकायदेशीररित्या येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जे लोक तात्पुरता व्हिसा घेऊन अमेरिकेत येतात आणि येथे व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही राहतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोलोरॅडो येथील दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध लोकांना प्रवेश बंदी हा त्यावर एक उपाय आहे, असे प्रतिपादन ट्रंप यांनी केले आहे.
कोलोरॅडा हल्ला कोणी केला...
कोलोरॅडो येथील बोल्डर येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याचे नाव मोहम्मद साब्री सोलिमा असे आहे. मागच्या बायडेन प्रशासनाने त्याला, त्याच्या व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही अमेरिकेत राहू दिले होते. अमेरिकन नागरीकांची सुरक्षा हे डोनाल्ड ट्रंप यांचे प्रमुख धोरण आहे. त्यामुळे यापुढे बेकायदा लोकांची गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन व्हाईट हाऊसचे अधिकारी अॅबिगेल जॅक्सन यांनी बुधवारी केले आहे.