इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेचा हल्ला
तीन महत्त्वाच्या आण्विक स्थळांवर टाकले बॉम्ब : कोणतेही नुकसान झाले नसल्याचा इराणचा दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन, तेहरान
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली असून इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर अमेरिकेने बॉम्बहल्ला केला आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे 4:30 वाजता फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुतळांवर हल्ला करण्यात आला. मात्र, अमेरिकेने हल्ला केलेल्या अणुस्थळांवर कोणतीही गळती झालेली नाही. तेथील युरेनियम आधीच हटवण्यात आले होते, असा दावा इराणने केला आहे. तथापि, हल्ला पेलेली तिन्ही ठिकाणी पूर्णपणे नष्ट झाल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. प्रत्यक्षात वेगवेगळे दावे-प्रतिदावे होत असले तरी अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर संघर्ष भडकल्याचे दिसून येत आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असतानाच अखेर अमेरिकेने इराणवर आक्रमण केले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला करून ती नष्ट केल्याचा दावा केला आहे. इराण या हल्ल्याला युद्धाची अनावश्यक कारवाई मानत असून, आता आम्हीही गप्प बसणार नसून बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमेरिकेला दिला आहे. रविवारी वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रुममधून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हान्स, व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुझी विल्स, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन आणि इतर कॅबिनेट सदस्य परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचे संबोधन
इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून अवघी तीन मिनिटे भाषण केले. ट्रम्प यांनी या हल्ल्यांना ‘मोठे लष्करी यश’ असे म्हणत फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान सारखे प्रमुख अणुतळ पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगितले. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणमधील तीन अण्वस्त्र केंद्रांवर बॉम्बहल्ले केले. इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धात हा मोठा टप्पा ठरतो. लक्षात ठेवा, अजूनही अनेक लक्ष्य शिल्लक आहेत. आजचा हल्ला सर्वांत कठीण आणि कदाचित सर्वात घातक होता. जर शांतता लवकर प्रस्थापित झाली नाही, तर आम्ही इतर तळांवरही अचूकतेने, वेगाने आणि कौशल्याने कारवाई करू, असा इशारा ट्रम्प यांनी आपल्या संबोधनातून दिला आहे.
हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य : फोर्डो प्रकल्प
अमेरिकेने बॉम्ब टाकलेल्या इराणच्या तीन अणुस्थळांपैकी फोर्डो हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फोर्डो हे एक युरेनियम संवर्धन केंद्र असून ते डोंगराच्या आत खोलवर लपवण्यात आले आहे. फोर्डो येथे महत्त्वाची भूमिगत युरेनियम संवर्धन सुविधा असल्याचे सांगितले जाते. पण, फोर्डो अणुस्थळ कॉम काउंटीमध्ये असल्याचे एका खासदाराने सांगितले. रविवारी झालेल्या अमेरिकी हल्ल्यानंतर अणुस्थळातून कोणतेही धोकादायक पदार्थ उत्सर्जित झाले नाहीत, कारण हे केंद्र आधीच रिकामे करण्यात आले होते. दरम्यान, तिथे झालेल्या नुकसानीची काही छायाचित्रे अमेरिकेने जारी केली असली तरी संपूर्ण तपशील समोर आलेला नाही. उपग्रह प्रतिमांमध्ये इराणच्या फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पात जाणारे रस्ते खराब झाल्याचे दिसून आले आहे. हा प्रकल्प डोंगराच्या आत बांधला गेला आहे. तसेच छायाचित्रांमध्ये हलका धूर देखील दिसत आहे.
इराणचा इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्ला
अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. आम्ही इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला करत 14 महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले असल्याचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने म्हटले आहे. त्याचवेळी, ‘टाईम्स ऑफ इस्रायल’नुसार, इराणी क्षेपणास्त्रे हैफा आणि तेल अवीवमधील लष्करी आणि निवासी ठिकाणांवर पडली आहेत. इस्रायलमध्ये आतापर्यंत 86 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
गळतीचा धोका नाही, जीवितहानीही नाही : इराण
अमेरिकेने इराणच्या अणुतळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, इराणने आपल्या पहिल्या अधिकृत प्रतिक्रियेत या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि रेडिएशन गळतीचा धोका नाही, असे म्हटले आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेने या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. आम्ही आमच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचेही इराणने स्पष्ट केले.
इराणचे परराष्ट्रमंत्री रशियाला भेट देणार
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची रविवारी रशियाला रवाना झाले. या दौऱ्यात ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. रशिया हा इराणचा मित्र आहे. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी आहे. इराण आणि रशिया नेहमीच एकमेकांशी सल्लामसलत करून निर्णय घेतात. रशिया हा इराणच्या जेसीपीओए अणु करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांपैकी एक आहे.
आता चर्चेला काही अर्थ नाही : इराण
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता राजनैतिक चर्चेला काही अर्थ नसल्याचे स्पष्ट केले. राजनैतिकतेचा मार्ग नेहमीच खुला असावा हे खरे आहे. परंतु सध्यातरी ही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले. त्याचवेळी, इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा निषेध करण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.