अमेरिकेच्या भूदलप्रमुखांना डच्चू
संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी दिला त्यागपत्राचा आदेश
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे भूदल प्रमुख रँडी जॉर्ज यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पेट हेगसेथ यांनी गुरुवारी त्यांना त्यागपत्र देण्याची सूचना केली. या सूचनेनुसार त्यांनी त्यांचे पद सोडले असल्याची माहिती आहे. पँटागॉनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनीही या वृत्ताला त्वरित दुजोरा दिलेला आहे.
अमेरिकेत भूदलप्रमुखांची नियुक्ती सर्वसाधारणपणे चार वर्षांसाठी केली जाते. जॉर्ज यांची या पदावर नियुक्ती माजी राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी 2023 मध्ये केली होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. तथापि, त्यांना हा कालावधी पूर्ण होण्याच्या आतच निवृत्त होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
कारण गुप्त
रँडी जॉर्ज हे नावाजलेले सेनाप्रमुख होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संग्रामांमध्ये अमेरिकेच्या सेनेचे नेतृत्व केले आहे. त्यांना त्यागपत्र देण्याचा आदेश का देण्यात आला, यावर आता चर्चा होत आहे. अधिकृतरित्या या निर्णयाचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा अंत आता लवकरच होईल, असा संदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन दिवसांपूर्वी अमेरिकेला उद्देशून केलेल्या भाषणात दिला होता. त्यानंतर त्वरित भूसेना प्रमुखांना पद सोडण्याचा आदेश देण्यात आल्याने गूढ निर्माण झाले आहे.
सेना नेतृत्वात व्यापक परिवर्तन
आपल्या सेनांच्या नेतृत्वात व्यापक परिवर्तन करण्याची अमेरिकेच्या प्रशासनाची योजना आहे. मागच्या जोसेफ बायडेन प्रशासनाच्या काळात ज्या सेनाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांच्यापैकी अनेकांना या योजनेच्या अंतर्गत पद सोडण्याचा आदेश देण्यात येईल, अशी शक्यता आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने हा व्यापक परिवर्तन करण्याचा निर्णय सेनेचे सामर्थ्य वाढविण्यासाठी घेतला आहे.
ख्रिस्तोफार लानेव्हे यांची नियुक्ती
अमेरिकेच्या भूसेना प्रमुखपदी विद्यमान भूसेना उपप्रमुख ख्रिस्तोफर लानेव्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भूसेनेचे कार्यकारी प्रमुख पद देण्यात आले आहे. कालांतराने त्यांचीच नियुक्ती नियमित भूसेना प्रमुख म्हणून केली जाऊ शकते. तथापि, यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या अचानक परिवर्तनामुळे अमेरिकेतही अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया आणि सूचना व्यक्त केल्या.