For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या राजदूताच्या टिप्पणीमुळे मध्यपूर्वेत संताप

06:26 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या राजदूताच्या टिप्पणीमुळे मध्यपूर्वेत संताप
Advertisement

14 मुस्लीम देशांकडून टीका : सौदी-युएई देखील संतप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माइक हकाबी यांच्या एका वक्तव्यामुळे पूर्ण मध्यपूर्वेत कूटनीतिक वादळ उभे ठाकले आहे. 14 मुस्लीम देश आणि संघटनांनी राजदूतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. इस्रायल बायबलमध्ये वर्णन असलेल्या पूर्ण क्षेत्रावर नियंत्रण मिळविले तर योग्य होईल अशी टिप्पणी हकाबी यांनी एका पॉडकास्टमध्ये केली आहे. गाझायुद्ध आणि वेस्ट बँकेवरून पूर्वीच क्षेत्रात तणाव असताना ही टिप्पणी समोर आली आहे. पूर्वाश्रमीचे बाप्टिस्ट पाद्री आणि दीर्घकाळापासून इस्रायल समर्थक माइक हकाबी यांनी टकर कार्लसनच्या पॉडकास्टमध्ये हे वक्तव्य केले आहे.

Advertisement

पॉडकास्टमध्ये बायबलमधील एका वर्णनाचा उल्लेख झाला, ज्यावरून इस्रायलला नाईल नदीपासून सीरिया आणि इराकच्या युफ्रेट्स नदीपर्यंतच्या भूमीचा अधिकार असल्याचे काही लोकांचे मानणे आहे. इस्रायलने हे संपूर्ण क्षेत्र स्वत:च्या नियंत्रणाखाली आणले तर योग्य होईल. परंतु इस्रायल अशी मागणी करत नसल्याचे स्पष्टीकरण हकाबी यांनी दिले आहे.

या टिप्पणीनंतर 12 हून अधिक अरब आणि मुस्लीम देशांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. संयुक्त अरब अमिरातच्या विदेश मंत्रालयाकडून जारी एका संयुक्त वक्तव्यात या टिप्पणीला ‘धोकादायक’ आणि ‘प्रक्षोभक’ ठरविण्यात आले. या वक्तव्यावर युएई, सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन, तुर्किये, पाकिस्तान, कतार, कुवैत, ओमान, बहारीन, लेबनॉन, सीरिया आणि पॅलेस्टाइन समवेत अनेक देशांनी स्वाक्षरी केली आहे. तसेच इस्लामिक सहकार्य संघटना, अरब लीग आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिलनेही अमेरिकेच्या राजदूताच्या विरोधात भूमिका मांडली आहे. अमेरिकेच्या राजदूताची टिप्पणी संयुक्त राष्ट्रसंघ चार्टरविरोधात असून गाझा युद्ध संपविण्याच्या प्रयत्नांना कमकुवत करणारी असल्याचे संयुक्त वक्तव्यात म्हटले गेले आहे.

सौदी अरेबियाची भूमिका

अमेरिकेच्या राजदूताची टिप्पणी अनावश्यक असल्याचे सौदी अरेबियाने नमूद केले आहे. तर जॉर्डनने याला क्षेत्रीय सार्वभौमत्वावरील थेट हल्ला ठरविले आहे. कुवेतने याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन संबोधिले आहे. अशाप्रकारच्या टिप्पणींमुळे शांततेच्या शक्यतांना नुकसान पोहोचत असल्याचा इशारा ओमानने दिला आहे. इस्रायलच्या कब्जातील पॅलेस्टिनी भाग आणि कुठल्याही अन्य अरब भूमीवर कुठलाच सार्वभौम अधिकार नसल्याची भूमिका इजिप्तने मांडली आहे.

हकाबी यांचे स्पष्टीकरण

स्वत:च्या टिप्पणीवरून वाद निर्माण झाल्यावर हकाबी यांनी सोशल मीडियावर काही स्पष्टीकरणं दिली. परंतु स्वत:च्या बायबलसंबंधी वक्तव्यावरून कुठलेच स्पष्टीकरण दिलेले नाही. तर दुसरीकडे इस्रायलच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी हकाबी यांचे कौतुक करत त्यांना इस्रायलचा खरा समर्थक संबोधिले आहे.

Advertisement
Tags :

.