For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उर्विल पटेलचा टी-20 मध्ये जलद शतकाचा भारतीय विक्रम

11:42 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
उर्विल पटेलचा टी 20 मध्ये जलद शतकाचा भारतीय विक्रम
Advertisement

रिषभ पंतचा विक्रम टाकला मागे

Advertisement

वृत्तसंस्था/इंदोर, मध्यप्रदेश

गुजरातचा 26 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेलने रिषभ पंतचा टी-20 मध्ये वेगवान शतक नोंदवण्याचा भारतीय विक्रम मागे टाकला. येथे सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 क्रिकेट स्पर्धेतील त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ 28 चेंडूत शतक नोंदवला. जगभरातील खेळाडूंत त्याने नोंदवलेले हे दुसरे जलद शतक आहे. त्याने 35 चेंडूत नाबाद 113 धावा झोडपल्या. त्रिपुराने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने त्रिपुराच्या गोलंदाजांची अक्षरश: कत्तल करताना 7 चौकार आणि 12 षटकार ठोकत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. 322.86 च्या स्ट्राईकरेटने फटकेबाजी करीत त्याने गुजरातला 58 चेंडूत बाकी ठेवत 8 गड्यांनी दणदणीत विजय मिळवून दिला. त्याचा सलामीचा जोडीदार आर्या देसाईने त्याला पूरक साथ देत 24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 38 धावा फटकावताना 150 धावांची सलामी दिली. तत्पूर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा भेदक मारा असला तरी त्रिपुराने 20 षटकांत 8 बाद 155 धावांची मजल मारली ती श्रीदम

Advertisement

पॉलच्या शानदार अर्धशतकांमुळे. पॉलने 49 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने 57 धावा फटकावल्या. अर्झन नागवासवाला गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 35 धावांत 3 बळी मिळविले. याशिवाय चिंतन गजानेही 18 धावांत 2 बळी मिळविले तर अक्षर पटेलने 1 बळी टिपला. विशेष म्हणजे उर्विल पटेलने आयपीएल महालिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली होती. पण त्याला एकाही फ्रँचायजीने आपल्या संघात घेतले नाही. 2023 च्या मोसमात त्याला गुजरात टायटन्सने घेतले होते. पण त्याला लीगमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली  नाही. विस्डेननुसार, उर्विलने 44 टी-20 सामन्यात 988 धावा 23.52 च्या सरासरीने जमविताना 164.11 चा स्ट्राईकरेट राखला. त्याने एक शतक व चार अर्धशतके नोंदवली असून नाबाद 113 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 क्रिकेटमध्ये इस्टोनियाच्या साहिल चौहानने सर्वात वेगवान शतक नोंदवण्याचा विक्रम केला आहे. त्याने यावर्षी सायप्रसविरुद्ध झालेल्या सामन्यात केवळ 27 चेंडूत शतक नोंदवले होते. रिषभ पंतने 32 चेंडूत शतक नोंदवले होता. भारतीय फलंदाजाने नोंदवलेले ते सर्वात वेगवान टी-20 शतक होते. आता उर्विल पटेलने हा भारतीय विक्रम मागे टाकला आहे.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा 20 षटकांत 8 बाद 155 : श्रीदम पॉल 49 चेंडूत 57, श्रीनिवास शरथ 23 चेंडूत 29, रियाझउद्दिन 16, अभिजित सरकार नाबाद 15, अवांतर 13. नागवासवाला 3-35, चिंतन गजा 2-18. गुजरात 10.2 षटकांत 2 बाद 156 : उर्विल पटेल 35 चेंडूत नाबाद 113, आर्या देसाई 24 चेंडूत 38, मणिशंकर मुरासिंग 1-41, परवेझ सुलतान 1-26.

Advertisement
Tags :

.