यल्लम्मा डोंगरावर मूलभूत सुविधांची कामे त्वरित करा
पर्यटन विकासमंत्री एच. के. पाटील यांची अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना
बेळगाव : भाविकांचे श्रद्धास्थान सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराला प्रतिवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. भाविकांच्या सोयीसाठी तेथे मूलभूत सुविधांची कामे हाती घेण्यासाठी त्वरित प्रयत्न व्हावेत, अशी सूचना कायदा-संसदीय व्यवहार व पर्यटन विकासमंत्री एच. के. पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. सौंदत्ती यल्लम्मा डोंगर समग्र विकास योजनेशी संबंधित शुक्रवारी येथील सरकारी विश्रामधामात झालेल्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून मंत्री पाटील बोलत होते.
100 कोटी रुपये विशेष अनुदान व प्रसाद योजनेंतर्गत वितरण करण्यात आलेल्या अनुदानातून हाती घेण्याच्या कामासंबंधी मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रसाद योजनेंतर्गत दोन बहुपयोगी सभागृहे, स्वच्छतागृह, स्नानगृह, माहिती केंद्रे, उपाहारगृह, प्राथमिक चिकित्सा केंद्र, कचरा टाकण्यासाठी व्यवस्था, तसेच डिजिटल माहिती विभाग सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर 100 कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून भाविकांसाठी संकुल, वाहन पार्किंगची व्यवस्था, अन्नदानासाठी भवन, व्यापारी गाळे, प्रशासकीय इमारत, यासह विविध कामे हाती घेण्यासाठी योजना तयार करण्यात आली असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
सौंदत्ती येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मास्टर प्लॅनबाबतच्या निर्णयानुसार कामे सुरू करावीत, अशी सूचनाही मंत्री पाटील यांनी केली.रेणुका देवीचे दर्शन, भोजन, पार्किंग, स्वच्छतागृह या सुविधांबरोबरच अन्य सुविधाही भाविकांना सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात, असेही मंत्री पाटील म्हणाले. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सौंदत्ती यल्लम्मा सुक्षेत्रावर सुरू करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती दिली. बैठकीला जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, रेणुका पर्यटन विकास मंडळाच्या अधिकारी गीता कौलगी, पर्यटन खात्याच्या संयुक्त संचालिका सौम्या बापट यांसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.